इंडिया आघाडी देशात 300 जागा जिंकेल
। मुंबई । प्रतिनिधी ।
सध्या पंतप्रधान मोदी तिसर्यांदा पुन्हा सत्तेत येणार, अशी हवा असली तरी त्याबद्दल कोणालाही खात्री नाही. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या विजयाची खात्री देऊ शकत नाहीत. तुम्ही मोदींचा चेहरा पाहा, कसा काळवंडला आहे. अमित शाह यांची दाढीही जळाल्यासारखी वाटते. अमित शाह आत्मविश्वासाने जिंकण्याची भाषा करत आहेत. पण घाबरलेल्या माणसाकडेच अतीआत्मविश्वास असतो. आमचे एकनाथ शिंदे बघा, खरी शिवसेना माझीच असे सांगत आहेत. शिवसेना जन्माला आली तेव्हा एकनाथ शिंदे गोधडीत खेळत होते, अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली. पुन्हा सत्तेत येण्यासाठी पंतप्रधान मोदी कुठून जागा आणणार? आम्ही राज्यात 30-35 जागा जिंकणार. तर इंडिया आघाडी देशभरात 300 जागा जिंकेल. मोदी आम्हाला मजबूत विरोधी पक्षनेते म्हणून आम्हाला समोर हवे आहेत, अशी टिप्पणी राऊत यांनी केली.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, भाजपने शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे 2019 मध्येच मुखमंत्री असते. 2019 मध्ये भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. गुजरातच्या व्यापार्यांनी महाराष्ट्रात खेळ खंडोबा केला आहे. आम्ही तुरुंगात गेलो, आजारी पडलो, आज माझा डावा हात चालत नाही पण आम्ही भांडवल केले नाही. ज्या पक्षाने सर्वस्व दिले त्यासाठी मी लढत राहणार, मी पलायन करणार नाही, मी लढायला आणि मरायला तयार आहे. भाजपसोबत कधी जाणार नाही. इंडिया आघाडीला 300 जागा मिळतील, असेही संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपच्या ताब्याच्या महापालिका होत्या किंवा आहेत. त्यामध्ये नाशिक महापालिका सर्वात महत्त्वाची महापालिका आहे. नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा झाला असून त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या मर्जीतले बिल्डर 800 कोटींचे लाभार्थी आहेत. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत पत्र लिहिले आहे.
800 कोटी मर्जीतल्या बिल्डरांना दिले आठशे कोटी रुपये ठराविक बिल्डरांच्या घशात घातले. जागा ताब्यात घेण्यासाठी शासनाने ठरवून दिलेले जे प्राधान्यक्रम होते त्या कोणत्याही नियमांचे पालन केले नाही आणि साधारण 800 कोटी रुपये आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना दिले. त्यातले काही बिल्डर मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर होते. त्यातले मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले ठक्कर नावाचे बिल्डर आहेत. काही बिल्डरांनी त्या काळामध्ये जमिनी विकत घेतल्या. शेतकरी नसतानाही जमिनी विकत घेतल्या आणि त्याच जमिनी एका महिन्यामध्ये पाचपटीने वाढवून त्या बिल्डरांनी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये घेतले, अशी 27 प्रकरणे आहेत
प्रत्येक व्यवहाराचा माझ्याकडे पुरावा प्रत्येक व्यवहाराचा पुरावा माझ्याकडे आहे. एक फाईल मी मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवणार आहे. मुख्यमंत्री, प्रधानमंत्री कार्यालय आणि ईडीला सर्व माहिती दिलेली आहे. ठक्कर बिल्डरला या प्रकरणात 355 कोटींचा लाभ झाला. मनवानी नावाचे एक बिल्डर आणि कुटुंब आहे. त्यांना 53 कोटी रुपयांचा लाभ झाला झाला. शाह नावाच्या बिल्डरला आठ कोटी रुपयांचा लाभ झाला. इतर बिल्डरांना 200 कोटी रुपयांचा लाभ झालेला आहे.
तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही याबाबत चौकशी मुख्यमंत्री करणार नाही तर पण भ्रष्टाचाराची उच्चाटन करण्याची घोषणा प्रधानमंत्री यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ते खोटं आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, एसआयटी स्थापन करावी या प्रकरणाची ईडीने चौकशी करावी, या पहाराबद्दल गुन्हे दाखल व्हावेत. जर असं नाही झालं तर जेव्हा आमचं सरकार बदलेल तेव्हा या 800 कोटी घोटाळ्यातील सर्व लाभार्थ्यांना मनी लाँडरिंग प्रकरणात आम्ही तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.