| नगर | वृत्तसंस्था |
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली असली, तरी देशातील जनतेची त्यांना सहमती मिळाली आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारचा उल्लेख ‘लंगडे सरकार’ असा करत लोकशाहीतील मतदारांच्या ताकतीमुळे आता ‘मोदी सरकार’ही राहिले नाही आणि ‘मोदी गॅरंटी’ही राहिली नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात केली.
लोकसभा निवडणुकीतील यशाच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये पक्षाच्यावतीने सोमवारी विजयोत्सवी सभेचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या नवनिर्वाचित आठ खासदारांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तसेच पक्षाचे राज्यातील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले, की मोदी यांनी प्रचारात तारतम्य ठेवले नाही, मर्यादा पाळल्या नाहीत. अल्पसंख्याकांबद्दल द्वेष व्यक्त केला. माझा ‘भटकता आत्मा’ असा उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेला ‘नकली शिवसेना’ म्हणाले. सत्ता मिळण्याची शक्यता नसते तेव्हा अशी बेफाम वक्तव्ये केली जातात, असा टोला पवार यांनी लगावला. राम मंदिर उभारले याचा आनंदच आहे. मी तेथे गेलो तर मंदिरात जाईनही. परंतु मोदींनी चुकीचा वापर केल्याने अयोध्येतील जनतेने मोदींचा पराभव केला, असे पवार म्हणाले. यावेळी शेकापचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, शशिकांत शिंदे, प्राजक्त तनपुरे, उत्तम जानकर आदींचे भाषण झाले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी स्वागत केले.
पवारसाहेब महाराष्ट्राचा अभिमानः आ. जयंत पाटील शरद पवार हे महाराष्ट्राला मोठा अभिमान वाटवा असे नेते आहेत. त्या नेत्याचे तुम्ही खरे सैनिक आणि कार्यकर्ते आहात. आणि म्हणून याठिकाणी आम्ही लढतो. परंतु, संबंध ठेवण्याची जी परंपरा पवारसाहेबांची आहे आणि गरीबांचा उद्धार करण्याची जी भूमिका त्यांनी पहिल्यापासून घेतली, ती आजतागाय जपली आहे. त्यांचे घराणे पहिले शेतकरी कामगार पक्षाचेच होते. आणि त्यामुळे त्यांच्यावर ते विचार कायम राहिले आहेत, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले. संविधानाचे संरक्षण का करायला पाहिजे, ते बीडच्या जनतेने दाखवून दिल्याचे आ. पाटील म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या ज्या अधिकार्यांनी चुकीचे काम केले, त्यांच्या विरोधात येत्या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आ. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
मराठ्यांची पवारांना साद नाशिकमधील सकल मराठा समाजाचे समन्वयक करण गायकर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं, अशी मागणी केली आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत पवारांनी नेतृत्व करावे. समाजात शरद पवारांचे वेगळे स्थान आहे. तुम्ही ठरवलं तर समाज आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही. मराठ्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन केले आहे.