मोदींचा रोड शो गुजराती समाजासाठी

यामुळे सामान्य नोकरदारांचे प्रचंड हाल

| नाशिक | प्रतिनिधी |

मोदी दहा वर्षांपासून पंतप्रधान असले, तरी मी विधानसभा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मागील 56 वर्षांपासून काम करीत आहे. सध्याच्या घडीला असा एक तरी असा माणूस दाखवावा, असे आव्हान शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. पंतप्रधान मोदी यांनी दिंडोरीमील जाहीर सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. शरद पवारांना पक्ष सांभाळता आला नाही, तर ते देश काय सांभाळतील, या पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवार यांनी मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

मुंबईसारख्या शहरात रोड शो करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. त्यामुळे लोकांना तासनतास थांबावे लागते, वाहतूक कोंडी होते, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात रोड शो केला होता. या रोड शोसाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले होते. मुंबई पूर्व उपनगर आणि ठाण्याला जोडणारा लाल बहादूर शास्त्रीमार्ग रोड शोसाठी बंद ठेवण्यात आला होता. याशिवाय, वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सेवाही काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. यामुळे संध्याकाळी कामावरुन घरी निघालेल्या सामान्य नोकरदारांचे प्रचंड हाल झाले होते. याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर नाराजीही व्यक्त केली होती. मुंबईसारख्या शहरात रोड शो करणे, शहाणपणाचे लक्षण नाही. तो भाग प्रामुख्याने गुजराती वस्तीचा आहे. मोदींना रोड शो करायचाच होता, तर मुंबईत मोठे रस्ते असलेला भाग होता. पण मोदींचे लक्ष्य विशिष्ट वर्ग होता. मात्र, त्यामुळे लोकांना त्रास झाला, असे शरद पवार यांनी म्हटले.

पुढे बोलताना पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी मी इतक्या वर्षात काय केले, असा प्रश्न विचारतात. ते गुजरातचे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या राज्यातला शेतीचा कोणताही विषय राहिला तर ते माझ्याकडे यायचे. मी ही गुजरातला जायचो. मी एकदा इस्रायलला जात असताना मला मोदींचा फोन आला. त्यांनी सांगितले की, मला अमेरिकेचा व्हिसा नाकारला आहे. मला तुमच्यासोबत इस्रायलला येण्याची इच्छा आहे, मला घेऊन चला, असे ते म्हणाले. मी त्यांना घेऊन इस्रायलला गेलो. इस्रायलमध्ये शेतीतील प्रगत कृषी तंत्रज्ञान आणि इतर गोष्टी मी त्यांना दाखवल्या. एवढं सगळं माहिती असूनही पंतप्रधान मोदी असे का बोलतात, त्याचे कारण राजकारण आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

मोदींकडून विषय भरकटवण्याचा प्रयत्न
पंतप्रधान मोदी यांनी कल्याणमधील सभेत भाषण करताना काँग्रेस पक्षाने हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे बजेट तयार केल्याचे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी म्हटले की, मोदींचे हे बोलणं योग्य नाही. बजेट हे कुठल्या जातीधर्माचे नसते. देशाचे बजेट असते. मोदी बोलतात, ते कधीही होऊ शकत नाही. मोदींचा कॉन्फिडन्स ढासळला आहे. मोदींकडे काही सांगण्यासारखे शिल्लक नाही, त्यामुळे ते विषय भरकटवत आहेत. ते जे बोलत आहेत, त्यापैकी एक टक्कादेखील काही खरे नाही. जातीधर्माचा विचार करून देश चालत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
दिंडोरी सभा कांद्यामुळेच सर्वाधिक चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिंडोरी लोकसभेची जाहीर सभा कांद्यामुळेच सर्वाधिक चर्चेत राहिली. गेल्या सहा महिन्यांपासून मोदी सरकारने केलेली निर्यातबंदी आणि त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर निर्यातबंदी उठवल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे मोदींच्या दिंडोरीमधील जाहीर सभेत एका तरुण शेतकऱ्यांने कांद्यावर बोला, असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर त्या तरुण शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते. या तरुण शेतकऱ्याचे शरद पवार यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, मोदींना कांद्यावर बोला, असे तरुण शेतकऱ्याने प्रश्न विचारला तर ते योग्य आहे. किरण सानप हा माझ्या पक्षाचा आहे का तर माहीत नाही. मात्र, तो माझ्या पक्षाचा असल्यास तर त्याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी या तरुणाचे कौतुक केले.
प्रफुल पटेलांवर बोचरी टीका
महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचे काम या नेत्यांकडून होत आहे. महाराजांचा अवमान करणाऱ्या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही, अशी टीका शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. मात्र, शरद पवारांनी आतापर्यंत कोणतेही भाष्य केले नव्हते. आज पहिल्यांदाच प्रफुल पटेलांच्या या कृतीचा शरद पवारांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
Exit mobile version