मोहिली पुलाची तातडीने दुरुस्ती होणार-सुधाकर घारे

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर मोहिली-आडोशी गावांना जोडणारा मोहिली पूल महापुराच्या पाण्याने शितिग्रस्त झाला आहे. त्या पुलाची पाहणी केल्यानंतर पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनीि जल्हा परिषद बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

वासरे भागात मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बीड सारख्या मोठे गाव असलेल्या भागत जाण्यासाठी मोहिली पूल अत्यंत महत्वाचा आहे. पुलाचा काही भाग उल्हास नदीला आलेल्या महापुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. या पुलावरून 21 जुलैच्या मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत पूराचे पाणी वाहत होते. पुलावरून पाणी वाहत असल्याने या भागातील गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे याच भागात राहणारे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी मोहिली पुलाची पाहणी केली.

पुलाचा काही भाग वाहून गेल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता गोपणे यांना पुलाची पाहणी करताना सोबत बोलावून तातडीने पुलाची दुरुस्ती झाली पाहिजे, अशा सूचना दिल्या. दुसरीकडे याच पुलावरून आजूबाजूच्या 40 हुन अधिक गावातील लोक मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी जात असतात. त्यात कोव्हिड लसीकरण देखील सध्या सुरू असून पूल वाहतुकीस बंद झाल्यास रुग्ण आणि लसीकरण घेण्यासाठी येणार्‍यांची मोठी गैरसोय होऊ शकते. त्यामुळे तातडीने पुलाची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी बीड ग्रामपंचायतच्या सरपंच प्रभावती लोभी यांनी केली.

Exit mobile version