माढ्यात मोहिते पाटलांना उमेदवारीची शक्यता

| माढा | वृत्तसंस्था |

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून नाराज असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओकवर जाऊन धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील भाजपला लवकरच मदे धक्काफ देणार हे निश्‍चित झाल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

मोहित पाटील आणि शरद पवारांच्या भेटीत माढा लोकसभा निवडणुकीबाबत खलबतं झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, येत्या 13 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार असल्याचं बोललं जात असून याच दिवशी ते आपली उमेदवारी दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

मोहिते पाटील यांनी 2019 मध्ये भाजपत प्रवेश करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विराट शक्ती प्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असणारी माढा लोकसभा भाजपाला जिंकून दिली होती. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर शरद पवार आणि आघाडीच्या नेत्यांसमोर मोठं शक्तिप्रदर्शन करत शेतकरी मेळावा घेण्याचं नियोजन देखील सुरु झालं आहे. मोहिते पाटील यांना करमाळा येथून माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्यासह इतर तालुक्यातूनही मोठं समर्थन मिळू लागलं आहे. आता मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय शरद पवार केव्हा जाहीर करणार? त्यानंतर या सर्व घडामोडींना वेग येणार आहे. यासाठी मोहिते पाटील कुटुंबानं पहिलं पाऊल उचलत काल भेट तर घेतली. त्यामुळे सध्याच्या चर्चांनुसार, शरद पवार यांच्या घोषणेनंतर मोहिते पाटील भाजपाला दे धक्का देणार यात काही शंकाच नाही.

Exit mobile version