| कर्जत | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे रेल्वे स्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले कर्जत रेल्वे स्थानक अनेक समस्यांनी घेरले आहे. या समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटना आणि कर्जतकरांनी रेल्वे प्रशासनाला अनेक निवेदन दिले आहेत. तसेच, रेल्वे मंत्र्यांची देखील कर्जत रेल्वे स्थानकावर भेट घेण्यात आली होती. परंतु, अद्यापही कर्जत स्थानकातील समस्या सुटालेल्या नाहीत. त्यामुळे कर्जतकरांचा केंद्रीय मंत्री व खासदार यांच्यावरील विश्वास दिवसेंदिवस उडत चालला आहे. तरीही कर्जतकर विविध मार्गातून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान कर्जत, खोपोली, नेरळ, मोहापाडा, रसायनी व पेण या भागातील राजस्थानला जाणाऱ्या प्रवाशांनी काही दिवस अगोदर झेडआरयूसीसी सदस्य नितीन परमार यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी, पुण्याहून सुरू झालेली हडपसर-जोधपुर या गाडीला कर्जत येथे थांबा मिळण्यासाठी प्रयत्न करावे. ही गाडी सुरू होण्यासाठी पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रयत्न केले होते. तरी आपल्यातर्फे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र देण्यात यावे व या गाडीला कर्जत येथे थांब मिळावा, अशी विनंती आणि निवेदन देण्यात आले. त्यावर झेडआरयूसीसी सदस्य नितीन परमार म्हणाले की, काही दिवसा अगोदर या विषयावर मी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रत्यक्ष भेट घेतली असून या संदर्भात त्यांना निवेदन दिले असल्याचे सांगितले.







