। फुलिया । वृत्तसंस्था ।
पश्चिम बंगालमधील नॉर्थ 24 परगना जिल्ह्यामधील दमदम स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमध्ये एका तरुणीसोबत छेडछाड करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. मात्र या तरुणाने प्रसंगावधान दाखवत संपूर्ण घटनाक्रम फेसबुकवरुन लाइव्ह वेबकास्ट करत यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली. या तक्रारीच्या आदारावर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका 32 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका 24 वर्षीय तरुणी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नादिया जिल्ह्यामधील फुलिया स्थानकामध्ये शांतीपूर-सियालदह लोकल ट्रेनमध्ये बसली. ही ट्रेन दमदम स्थानकामध्ये पोहचली तेव्हा ट्रेनचा संपूर्ण डब्बा जवळजवळ खाली झाला. याच स्थानकावर आरोपी तरुण रेल्वेमध्ये चढला. ट्रेनमध्ये चढल्यानंतर हा इसम तरुणीसोबत अश्लील चाळे करु लागला. त्याने तिच्याकडे पैसे मागण्यास आणि तिला धमकावण्यास सुरुवात केली. या तरुणीने फेसबुक लाइव्ह करत संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. या मुलीने केलेला फेसबुक लाइव्हचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी संयुक्तरित्या मोहीम राबवत शनिवारी सायंकाळी या व्यक्तीला अटक केली. न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.







