मोखाड्यात आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचा विनयभंग; अधिक्षकाला अटक

मोखाडा | प्रतिनिधी |
मोखाडा तालुक्यातील आसे येथील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील 7 वी मध्ये शिक्षण घेणा-या 12 वर्षाच्या मुलीला घरकामाच्या निमीत्ताने बोलावून, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचे निंद्यनीय कृत्य त्याच आश्रमशाळेचे अधिक्षक योगेश अमरसिंग चव्हाण याने केले आहे. या निंदनीय घटनेची फिर्याद येथील शिक्षीका दीक्षा दिलीप निंबारा या महिलेने मोखाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मोखाडा पोलीसांनी अधिक्षक योगेश अमरसिंग चव्हाण याला अटक केली असून ठाणे सेशन कोर्टाने चव्हाण यास पांच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेविषयी फिर्यादी दिक्षा निंबारा यांनी दिलेल्या फिर्यादी वरून मोखाडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही आसे येथील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात निवासी शिक्षण घेत आहे. आरोपी योगेश चव्हाण हा निवासी वसतिगृहाचा अधीक्षक म्हणून नोकरी करतो. आरोपीने पीडित मुलीस घरातील भांडी धुण्यास बोलवले असता पीडित मुलगी आरोपीच्या घरात जाऊन भांडे घासून घराची फरशी पुशीत असताना, आरोपीने तिचा हात पकडून तीस तुझे कुणावर प्रेम आहे का ? असे सांगून तिच्याशी अंगलट करून अश्‍लील संभाषण करु लागला.
एवढ्यावरच हा नराधम न थांबता या विद्यार्थीनीला पकडून, उचलून बेड वर घेऊन गेला. तिच्या अंगात असलेला गाऊन वर करण्याचा प्रयत्न करून, छाती दाबुन, तीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. सदरचा प्रकार हा कोणाला सांगितला तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सदरची घटना आश्रमशाळेच्या आवारात 14 डिसेंबर ला घडली. दरम्यान, हा सर्व निंदनीय प्रकार शाळेतील एका महिला कर्मचार्याने बघितला, तीने ही घटना आपल्या सहकारी व वरिष्ठांना सांगितल्याने, घटनेचे बिंग फुटलं. तसेच सर्वत्र वाच्यता झाली.
अखेर 30 डिसेंबर ला या घटनेची तक्रार येथील शिक्षिका दिक्षा निंबारा यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. या फिर्यादी वरुन मोखाडा पोलीसांनी आरोपी योगेश चव्हाण विरोधात विनयभंग, अल्पवयीन मुलीवर अत्याचार ( पोस्को ) तसेच अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून योगेश चव्हाण या नराधमाला अटक केली आहे.

Exit mobile version