पोलादपूर शहरात माकडांचा सुळसुळाट

निर्बिजीकरण करण्याची मागणी

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

पोलादपूर नगरपंचायत हद्दीमध्ये निर्बिजीकरण झालेल्या कुत्र्यांपासून नागरिकांची सुटका झाली असली तरी सध्या सुमारे हजारहून अधिक माकडांचा सुळसुळाट सुरू आहे. माकडांच्या संख्येत कमालीची वाढ होत असून शाळा व बाजारपेठेकडे जाणार्‍या महिला व विद्यार्थ्यांना या माकडांपासून खजिल व्हावे लागत आहे. परिणामी, येत्या काळामध्ये माकडांची संख्या आणखी झपाट्याने वाढणार असून माकडांचे निर्बिजीकरण करण्यासाठी पोलादपूर नगरपंचायत व वनविभागाने संयुक्त उपक्रम राबवून शहरातील नागरिकांना दिलासा देण्याची गरज व्यक्त होत आहे.

पोलादपूर तालुक्यात 25 वर्षांपूर्वी गावडुक्करांनी हैदोस घातला होता. यानंतर पोलादपूर ग्रामपंचायतीने या गावडुक्करांना पकडून पोलादपूरपासून दूर नेऊन सोडण्याची मोहिम राबविली होती. यानंतर मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली. 2018 मध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने पोलादपूर शहरामध्ये अनेकांना चावे घेतल्यानंतर कुत्रे घातक वाटू लागले होते. यानंतर पोलादपूर नगरपंचायतीने कोल्हापूर येथील सोसायटी ऑफ अ‍ॅनिमल प्रोटेक्शन संस्थेच्या सहकार्‍यांमार्फत स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात निर्बिजीकरणाची मोहिम राबविली होती. यामुळे पोलादपूर शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येऊन कुत्र्यांच्या आक्रमकतेलादेखील पायबंद बसून श्‍वानदंश टळले आहेत. परंतु, आता माकडाच्या हैदोसाने येथील नागरिक त्रस्त झालेले आहेत.

यंदाच्या पावसाळ्यात अनेक मादी माकडे आपल्या छातीला कवटाळून पिल्लं घेऊन वावरताना दिसत आहेत. या माकडांचे मोठंमोठे कळप येथील श्रीकाळभैरवनाथ मंदिर, पोलादपूर तहसिल व नगरपंचायत कार्यालय, आनंदनगर, गाडीतळ, भैरवनाथनगर, सिध्देश्‍वरआळी, जुने पोलीस ठाणे आणि महाबळेश्‍वर रोडवरील भाजी व फळांची दुकाने या परिसरांमध्ये वावरत असल्याने या भागांतील नागरिक खुपच त्रस्त झालेले आहेत. नुकतेच पोलादपूर शहरानजिकच्या काटेतळी गावामध्ये एका माकडाने पाच-सहा जणांना कडकडून चावे घेतल्यानंतर पोलादपूर शहरामध्ये या माकडाने प्रवेश करून बाजारपेठेमध्ये व्यापारी, पादचारी आणि महिलांना त्रास देण्यास सुरूवात केली होती.

दरम्यान, दुकानदार सचिन बुटाला आणि पेपरविक्रेते दिलीप साबळे यांना या माकडाने चावे घेतल्याने त्यांनी तातडीने डॉक्टरांकडून रेबिजची इंजक्शन्स घेतली. मात्र, तेव्हा चावणारे माकड जेरबंद करण्यात यशस्वी झाले होते. परंतु, वन विभागाच्या अधिकार्‍यांना तसेच पोलादपूर नगरपंचायतीला माकडांपासून पोलादपूरकरांची कायमस्वरूपी सुटका करण्याची इच्छा दिसत नसल्याने अद्याप अनेक घरांचे काँक्रीटचे पत्रे तसेच वायफाय केबल, केबल टिव्ही, महावितरणची विद्युतमीटरपर्यंत जाणारी सर्व्हिस केबल, खिडक्यांची तावदाने यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

Exit mobile version