| उरण | वार्ताहर |
उरण शहरातील वीर सावरकर मैदानासमोरील रिक्षा स्टँडशेजारी भर रस्त्यावर परप्रांतीय हातगाडीवाल्यांनी उघड उघड दादागिरी सुरू केली आहे. रिक्षाचालकांचे कामकाज ठप्प व्हावे इतपत जागा अडवून या परप्रांतीयांनी आपली अघोषित सत्ता प्रस्थापित केली आहे. विशेष म्हणजे, या दादागिरीला उरण नगरपालिकेचे कर्मचारी पाठीशी घालत असल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे.
उरण शहरात परप्रांतीय हातगाडीवाल्यांची संख्या वाढत चालली असून, त्यांच्या दहशतीमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. तसेच, स्थानिक नागरिकांनी स्वतःची वाहने काही मिनिटांसाठी रस्त्यावर लावली तर ‘ती त्वरित काढा’, असा आदेश रिक्षा युनियनचे पदाधिकारी देतात. परंतु, भर रस्त्यावर उभ्या असलेल्या हातगाड्यांवर मात्र ते मूग गिळून गप्प रातात. त्यामुळे काहीतरी काळभैर सुरू असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे तेच कर्मचारी या हातगाडीवाल्यांकडून वसुली करून पावत्या फाडत आहेत. त्यामुळे हे खुलेआम भ्रष्टाचाराचे दर्शन असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे नगरपालिकेने तातडीने हे कर्मचारी बदलून, नव्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. ही बेशिस्त व्यवस्था त्वरित हटवली नाही, तर उरणकर रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही नागरीकांकडून दिला जात आहे.






