| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात तब्बल महिनाभर पावसाने दडी मारल्यानंतर गुरूवारी राज्यभर पुन्हा बरसण्यास सुरुवात केली. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाल्याचा आनंद शेतकरी वर्गामध्ये आहे. संपूर्ण मघा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर पूर्वा नक्षत्रात सहा सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली.
जळगाव जिल्ह्यात 24 तासांत जामनेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात यावल आणि अमळनेरमध्ये सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदाच पाऊस बरसला. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे. तसेच धरणांमधील जलसाठ्यालाही बूस्टर मिळणार आहे. पुढच्या पाच दिवसांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असताना शेतकऱ्यांनी कापसाला खत देण्यासाठी धावाधाव सुरूकेली आहे.“
पुण्याच्या मावळमध्ये जोरदार पाऊस कोसळला. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पिंपरी- चिंचवडसह मावळकरांचा यावर्षीचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. सध्या पवना धरणातून 3500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग पवना नदीत करण्यात येत आहे. पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात चांगला पाऊस झाला. मुंबईसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव,मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले,वांद्रे, सांताक्रुज परिसरात पावसाने चांगली बॅटिंग केली. दरम्यान, ठाण्याकडून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत होत्या.