पुढील पाच दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता
| पुणे | प्रतिनिधी |
मान्सूनने रविवारी उर्वरित महाराष्ट्र व्यापला असून, आता संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले. सोमवारपासून सुरू होणार्या आठवड्यामध्ये कोकण-गोवा येथे बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यामध्ये गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर आता मान्सूनच्या खंडानंतर, महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार आहे. त्याचे स्वरूप पूर्वमोसमी वळीव स्वरूपातील गडगडाटी पावसासारखे असण्याची शक्यता आहे. गेल्या पाच दिवसांपासून म्हणजे मंगळवार, 18 जूनपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. जूनच्या ह्या शेवटच्या आठवड्यातसुद्धा मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता ही अजूनही कायम टिकून आहे. तर मुंबई शहर, उपनगर, व कोकणात ह्या आठवड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
शेवटचा आठवडा पावसाचा बंगाल उपसागरात मान्सूनच्या पावसाला अनुकूल बदल झाले आहे. यामुळे आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. आता उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 10 जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
रायगडला ऑरेंज अलर्ट रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातार्याचा घाट परिसर या भागात या आठवड्यात ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने या काळात वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्येही मंगळवारपासून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो.