पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठक

| कोर्लई | वार्ताहर |

पावसाळ्यात उद्भवणार्‍या समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची सूचना मुरुडमध्ये नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठकीत उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांनी केली.

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व पावसाळा पूर्व तयारीबाबत उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांच्या अध्यक्षतेखाली मुरुड तहसील कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार रवींद्र सानप, महसूल नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ, गटविकास अधिकारी संगीता भांगरे, तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ, महावितरण उपअभियंता दातिर, फणसाड वन्यजीव अभयारण्य परिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आश्‍विनी लहाने, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा चोले, मुरुड आगार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी ढगे यांनी मुरुड शहर व तालुक्यातील सर्व विभागांनी पावसाळ्या पूर्वीची कामे तातडीने पूर्ण करून घेऊन तसेच आपल्या कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करून संपर्क अधिकार्‍यांचे दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करावे. आरोग्य अधिकार्‍यांनी आवश्यक औषध साठा प्राप्त करून घ्यावा. वीज विभागाने पावसाळ्याच्या पूर्वी धोकादायक कामे पूर्ण करून घ्यावी. बांधकाम विभागांनी रस्ते, नदी ओढ्यावरील साकव, पूल यांची पाहणी करून सुस्थितीत असल्याची खात्री करावी. ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रातील नालेसफाई पावसाळापूर्वी पूर्ण करावी, अशा सूचना उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांनी यावेळी दिल्या व सर्व विभागांनी आपल्या यंत्रणा सतर्क ठेवाव्यात, अशा सूचना केल्या.

Exit mobile version