गटारे कचर्याने तुंबली; तर नाल्यांमध्ये वाढल्या पानवेली
| खारघर | वार्ताहर |
पावसाळ्याच्या तोंडावर खारघर आणि तळोजा परिसरातील नाले, गटारे कचर्याने तुंबली आहेत. मात्र, निवडणुकीच्या कामात व्यग्र असलेल्या पालिकेकडून अद्यापही पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
खारघर आणि तळोजा वसाहतमधील पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामासाठी मागील वर्षी पालिकेने मे महिन्यात एका कंत्राटदाराची नेमणूक केली होती. या कंत्राटदाराकडून पावसाळा सुरू झाल्यानंतर थातूरमातूर कामे करण्यात आली होती. सध्या खारघर आणि तळोजा वसाहतमधील गटारे माती, प्लास्टिक आणि केरकचर्यांनी तुडुंब भरून वाहत आहेत. विशेष म्हणजे, मे अखेरपर्यंत पावसाळ्यापूर्वी सर्व कामे करणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेकडून अद्यापही कंत्राटदाराची नेमणूक केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. पालिका प्रशासन सध्या लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, खारघरमध्ये सेक्टर दोन लिटिल वर्ल्ड मॉलसमोरील नाला, सेक्टर सात, 12, 11 आणि सेक्टर 21 मधून सेक्टर 13 मार्गे कोपरा खाडीत तर सेक्टर 19 आणि सेक्टर 35 कडून सेक्टर 30 मार्गे मुर्बी खाडीकडे जाणारे मोठे नाले तुंबले आहेत. या नाल्यात पानवेली मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. पालिकेने मे महिन्यात पोकलेन लावून नाल्याची साफसफाई करणे आवश्यक होते. मात्र, पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामाकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामाकडे पालिकेचे लक्ष आहे. निवडणूक अधिकार्यांशी चर्चा करून लवकरच कंत्राटदाराची नेमणूक करून कामाला सुरुवात केली जाईल.
वैभव विधाते,
अधिकारी,
पनवेल महापालिका