मोरा-मुंबई जलसेवा बंद

हवामान विभागाचा धोक्याच्या इशारा

। उरण । प्रतिनिधी ।

मंगळवारी सुटलेल्या सोसाट्याचा वारा, अतिवृष्टी व खराब हवामान यामुळे भारतीय हवामान विभागाने समुद्रात धोक्याचा इशारा दिल्याने उरणमधील मोरा-मुंबई जलसेवा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी व चाकरमानी यांना रस्ते मार्गाने लांबचा प्रवास करावा लागत आहे. ही सेवा शुक्रवारी सुरू होण्याची शक्यता बंदर विभागाने व्यक्त केली आहे. उरणच्या मोरा, जेएनपीटी व करंजा या तीन बंदरातून मोरा ते मुंबई, जेएनपीटी ते मुंबई व करंजा ते रेवस (अलिबाग) या जलमार्गाने मार्गावर पावसाळ्यात ही सेवा सुरू असते. सोसाट्याचा वारा, अतिवृष्टी व खराब हवामानामुळे समुद्र खवळला आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणे धोक्याची असल्याने ही जलसेवा बंद करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या धोक्याच्या इशार्‍यामुळे मोरा ते मुंबई (भाऊचा धक्का) ही जलसेवा बंद करण्यात आल्याची माहिती मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली आहे.

Exit mobile version