मोरबे धरणाची उंची वाढविणार

नवी मुंबई महापालिकेची चाचपणी सुरू
। नवी मुंबई । वार्ताहर ।
एमआयडीसीच्या बारवी धरणातून मिळणार्‍या 65 दशलक्ष लिटर पाण्यात दिवसेंदिवस कमी पुरवठा होऊ लागल्याने नवी मुंबई पालिकेने पाण्याचे नवीन स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यात मोरबे धरणात पाताळगंगा नदीचे पाणी आणून सोडण्याच्या प्रकल्पाला प्रदूषणामुळे पूर्णविराम देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याऐवजी मोरबे धरणाच्या दरवाजांची उंची वाढवून वीस दशलक्ष लिटर पाणी अधिक साठवता येईल का याची चाचपणी केली जात आहे.
महापालिकेच्या मोरबे धरणातून येणारे 40 दशलक्ष पाणी हे सिडकोच्या खारघर, कळंबोली या क्षेत्रासाठी द्यावे लागत आहे. नवी मुंबई पालिका आपल्या एमआयडीसी क्षेत्रासाठी एमआयडीसीच्या बारवी धरणातून 65 दशलक्ष पाण्याची उचल करीत होती. मात्र दिवसेंदिवस या पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.
त्यामुळे खालापूर येथील मोरबे धरणात पाताळगंगा नदीचे पाणी जलवाहिनीद्वारे पाणी आणून टाकणे या एका पर्यायाचा विचार केला जात होता; पण पाताळगंगा नदीचे पाणी आजूबाजूच्या काही रासायनिक कारखान्यांमुळे दूषित झाले आहे, असा एक निकर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला पूर्णविराम देण्यात आला आहे. त्याऐवजी मोरबे धरणाच्या दरवाजांची उंची वाढवून धरणाचा साठा 450 दशलक्ष लिटरपेक्षा 470 दशलक्ष लिटर करता येईल का याची चाचपणी पालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञाचे मत विचारात घेतले जाणार असून मोरबे धरणाची उंची वाढविल्यास पालिकेला अधिक उपसा करता येणार आहे.

हेटवणेतील 100 दशलक्ष लिटर पाण्यावरही दावा
सिडकोला हेटवणे धरणाचे पाणी जादा पुरवठा झाल्यानंतर पालिका हेटवणे धरणातून 100 दशलक्ष लिटर पाण्यावर दावा करणार आहे. सिडकोने या धरणाची उंची आणि जलवाहिन्यावर 91 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे.

Exit mobile version