रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणात वाढ
। नवी मुंबई । वार्ताहर ।
डिसेंबर महिन्यात वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा उघड झाला होता. या कारवाईत सातत्य न राहिल्याने आता पुन्हा हा बेशिस्तपणा वाढला आहे. नवी मुंबईत मोठया प्रमाणात शहर वाहतूक केली जात असून त्यात पाच प्रवासी कोंबून वाहतूक केली जात आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रिक्षा चालकांबाबत तक्रारी वाढल्यानंतर 20 ते 27 डिसेंबर दरम्यान वाहतूक 60 टक्के रिक्षांवर कारवाई केल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले होते. यामुळे बेशिस्तीला आळा बसेल असे वाटत होते. मात्र कारवाई थांबल्यानंतर पुन्हा हा बेशिस्तपणा सुरू झाला आहे. आता तीनऐवजी पाच प्रवासी वाहतूक होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. वाशी कोपरखैरणे मार्गावर सर्वाधिक शअर वाहतूक होत असून या ठिकाणी हा प्रकार सर्रास सुरू आहे. हाच प्रकार एमआयडीसी, उलवा नोड, पनवेल, नेरुळ, कोपरखैरणे ते वाशी, घणसोली ते वाशी, घणसोली गाव ते घणसोली स्टेशन या ठिकाणीही हा प्रकार होत आहे.
पोलिसांचे दुर्लक्ष
वाशी कोपरखैरणे रस्त्यावर बहुतांश वेळा वाशी प्लाझा, अभ्युदय बँक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जैन मंदिर, ब्ल्यू डायमंड, बोनकोडे, डीमार्ट येथे वाहतूक पोलीस उभे असतात. इतर वाहनांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर कारवाई करतात. मात्र रिक्षांमधून अशी बेकायदा वाहतूक होत असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दीपचंद शहा या प्रवाशाने केला आहे.
मी कधीही तीनपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात नाही. वास्तविक असे सर्व रिक्षा चालकांनी केले तर सर्वच रिक्षाचालकांना चार पैसे मिळतील आणि नियमही मोडले जाणार नाहीत. मात्र माझ्यावरही दबाव येतो.
शंकर माने, रिक्षाचालक
याबाबत उपप्रादेशिक कार्यालयासमवेत बैठकही झाली असून लवकरच विशेष मोहीम घेत कारवाई करण्यात येईल. यात दंडात्मक कारवाईबरोबर प्रबोधनही केले जाईल.
दत्त तोटेवाड, साहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग