डिलिव्हरी बॉयच्या घरात 100 हून अधिक गॅस सिलेंडर; पोलिसही चक्रावले…

पनवेल तालुक्यातील तक्कागाव दर्ग्याजवळ आरोपी श्रीराम बिष्णोई याला पोलिसांनी ताब्यात घेतलं

नवी मुंबईत टेम्पोसह घरगुती गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून चार गुन्ह्यांची उकल नेरुळ पोलिसांकडून करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील तक्कागाव दर्ग्याजवळ आरोपी श्रीराम बिष्णोई याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बिष्णोईकडून 93 घरगुती सिलेंडर, 22 व्यावसायिक सिलेंडर आणि महिंद्रा कंपनीचा तीन चाकी टेम्पो जप्त करून त्याच्याकडून एकूण 10 लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे

पोलिसांनी पाळत ठेऊन आरोपीला अटक केली
आरोपीच्या अटकेनंतर इतर चार गुन्ह्यांची उकल देखील झाली आहे. आरोपीवर नेरुळ पोलीस ठाण्यात तीन तर एपीएमसी पोलीस ठाण्यात 1 गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. नेरुळ पोलिसांनी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अनेक दिवस आरोपीवर पाळत ठेऊन त्याला 7 जुलैला अटक केली .

गुन्ह्यात आणखी आरोपी असल्याचा पोलिसांचा दावा
आरोपीने चारही गुन्हे कबूल केले आहेत. आरोपीने सिलेंडर गॅस एजन्सीमध्ये गॅस डिलिव्हर बॉय म्हणून काम केले होते. त्याने टेम्पो चोरून त्यातील सिलेंडर झोपड्पट्टी परिसरात प्रत्येकी तीन हजार रुपयात विकला होता. पण या प्रकरणी आणखी काहीजण असण्याचा आमचा कयास आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस पुढील तपास करत असल्याचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पोलिसांच्या ‘या’ पथकाकडून कारवाई
*पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे, सहपोलीस आयुक्त भरत गाडे, नेरुळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे, पोलीस निरीक्षक गवळी, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर, सचिन मोरे आदी पोलीस अधिकारी यांनी कर्मचारी यांनी ही कारवाई पार पाडली.

Exit mobile version