तीनशेहून शाळांना नळ जोडणीची प्रतिक्षा

| अलिबाग | प्रमोद जाधव |

जलजीवन मिशनच्या अंतर्गत जिल्हा परिषद शाळांनादेखील मुबलक पाणी पुरवठा व्हावा म्हणून नळ जोडणी करण्यात आली. पहिली ते आठवीमधील दोन हजार 215 शाळांची नळ जोडणी करण्यास जिल्हा परिषदेला यश आले आहे. मात्र आजही जिल्ह्यातील 313 शाळा नळ जोडणीपासून वंचित असल्याचे समोर आले आहे. शाळेतील मुलांना शुध्द व मुबलक पाणी मिळावे हा उद्देश समोर ठेवून राबविलेली ही योजना आजही अपूर्ण आहे.

केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठा करण्याचे काम रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत केले जात आहे. जिल्ह्यात एक हजार 400हून अधिक योजना त्यासाठी मंजूर करण्यात आल्या. त्यासाठी कोटयावधी रुपये खर्च करण्यात आले. एकाच ठेकेदाराला 50 हून अधिक कामे देण्यात आली. मात्र ही कामे ठेकेदारांकडून पुर्ण न झाल्याने पाईप टाकूनदेखील नळाद्वारे पाणीच गावे, वाड्यांपर्यंत पोहचले नसल्याची तक्रार वाढत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत शाळांनादेखील नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत दोन हजार 528 शाळा असून दोन हजार 215 शाळांमध्ये नळ जोडणी करण्यात आली आहे. मात्र ज्या शाळांमध्ये नळ जोडणी झाली आहे, त्यातील काही शाळांमधील नळाद्वारे पाणीच पोहचले नसल्याची ओरड आहे. 313 शाळांमध्ये अजूनपर्यंत नळ जोडणी झाली नाही.त्यामुळे शाळांमधील नळ जोडणी योजनादेखील अपूर्ण असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड याकडे लक्ष देतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

नळ जोडणी न झालेल्या शाळांवर दृष्टीक्षेप

तालुकेशाळांची संख्या
अलिबाग24
कर्जत 73
खालापूर14
महाड30
माणगांव08
मुरुड06
पनवेल34
पेण55
पोलादपूर10
रोहा26
श्रीवर्धन04
सुधागड18
तळा09
उरण02
Exit mobile version