मोरेवाडी, ताडवाडी तहानलेली; आदिवासींची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट

| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतीमधील मोरेवाडी आणि ताडवाडी या आदिवासी वाडीमधील आदिवासी लोकांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. पावसाळा संपलेला आहे आणि लगेच येथील महिलांना पाण्यासाठी मातीच्या बंधार्‍यावर जावे लागत असल्याने आदिवासी महिलांना पुरुषांची मदत घ्यावी लागत असल्याने येथील आदिवासी लोकांचा रोजगारदेखील पाण्यासाठी बुडत आहे. कर्जत तालुका हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यामध्ये आदिवासी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. पण, या आदिवासी लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अनेक वर्षांनंतरदेखील सुटू शकला नाही. पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी आणि मोरेवाडी या एकूण 900 लोकसंख्या असेलल्या आदिवासीवाड्या आहे. या वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जो साठा आहे, तो दोन महिने पुरेल एवढाच उपलब्ध आहे, त्यामुळे या वाड्यामधील आदिवासी महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.

ताडवाडी आणि मोरेवाडी या आदिवासीवाड्यांबाबत शासनाची सुरू असलेली उदासीनता यामुळे हे आदिवासी नाराज आहे. चार वर्षांपूर्वी नळपाणी योजना मंजूर आहे, पण ती पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. ताडवाडीमधील आदिवासी लोकांसाठी दोन विहिरी आहेत, पण मोरेवाडीसाठी तशी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे या वाडीमधील महिलांना गावंडवाडी येथील मातीच्या बंधार्‍यावर जावे लागत आहे. ही समस्या नळपाणी योजना झाल्याशिवाय पूर्ण होणार नाही. वाडीसाठी मंजूर असलेली नळपाणी योजना कागदावर आहे, ती पूर्ण व्हावी यासाठी लवकरच कर्जतचे आ. महेंद्र थोरवे यांनी योजना पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले आहे. वाडीमधील कार्यकर्ते सुरेश दरवडा यांनी त्यासाठी आमदारांकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

पाण्यासाठी वणवण
महिलांना पाण्यासाठी गावंडवाडीच्या मातीच्या धरणावर जावे लागत आहे. मातीचा बंधारा हा मोरेवाडीपासून किमान दीड किलोमीटर अंतरावर असून, येऊन-जाऊन या आदिवासी महिलांना तीन किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. वाडीमध्ये नळपाणी योजनेचे भूमीपूजन झाले असून, त्या नळपाणी योजनेत पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी ताडवाडीपासून पुढे आणण्यात आली आहे. मात्र, या जलवाहिनीचा फायदा अन्य लोकांनी घेतला असल्याने आदिवासी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

Exit mobile version