मुरुडमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला

नगरपरिषदेकडून डास निर्मूलन फवारणी नाही

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

मुरुड शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, प्रतिबंधात्मक कोणतीही फवारणी मुरुड नगरपरिषदेकडून करण्यात आलेली नाही. आरोग्य विभागाचे दुर्लक्षित कारभारामुळे नागरिकांना डासांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आजार पसरण्याची भीती असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

सबनीस आळी, नवापाड कोळीवाडा, जुनापाडा कोळीवाडा, कुंभारवाडा, गणेश आळी बाजारपेठ आदी विविध भागात नगरपरिषदेने दरवर्षी करण्यात येणारी डास निर्मूलन फवारणी देखील केलेली नाही, अशी माहिती मुरूडचे माजी तहसीलदार नयन कर्णिक, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण गोंजी, जयश्री विलास जोशी, विलास जोशी, अभय जोशी, अशोक कमाने, आदेश दांडेकर, मनोहर बैले, रोहित खोत, संदेश नाईक यांनी दिली आहे. मुरूड शहरात नारळी-सुपारी बागायत क्षेत्र भरपूर आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असला तरी त्याआधी आणि नंतर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नगरपरिषदेने प्रभावी डास प्रतिबंधक फवारणी करणे फार महत्त्वाचे आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

लक्ष्मीखार भागात काही दिवसांपूर्वी करण्यात आलेली डास प्रतिबंधक फवारणी परिणामकारक नसल्याचे लक्ष्मीखार येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक कमाने यांनी सांगितले. डासांचा प्रचंड उपद्रव वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे शहरात थंडी, ताप, सर्दी, टॉयफाइड या रोगाची साथ पसरली असून, दवाखान्यातून रुग्णाची संख्या वाढती आहे. यामुळे नगरपरिषदेने त्वरित प्रभावी प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणी मुरुडकर करीत आहेत.

या संदर्भात मुरूड नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक राकेश पाटील यांच्याशी शनिवारी सायंकाळी संपर्क केला असता, ते म्हणाले शहरात डास प्रतिबंधक फवारणी करण्याचे काम सुरू केले होते; परंतु आठ दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे फवारणी बंद करण्यात आली. ती चालू करू. परंतु, प्रत्यक्षात गेल्या कित्येक दिवसात सर्व शहरात डास प्रतिबंधक फवारणी मोहीम राबविण्यात आली नसल्याचे नागरिकांतून सांगण्यात आले.

Exit mobile version