मोठे शहापूर, धेरंडवासियांचे उद्या एमआयडीसीविरोधात आंदोलन

| अलिबाग | प्रतिनिधी |

फुटलेल्या बंधार्‍यात उभे राहून रविवारी (दि.26) एमआयडीसीचा निषेध करण्याचा निर्धार शहापूर, धेरंडच्या खारभूमीग्रस्त ग्रामस्थांनी केला असल्याचे श्रमिक मुक्ती दलाने जाहीर केले. एक वर्षापासून शहापूर, धेरंड, ता. अलिबाग येथील एमआयडीसीच्या ताब्यातील फुटलेला बंधारा दुरुस्त न झाल्याने प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनामध्ये मोठे शहापूर व धेरंड येथील महिला, पुरुष, विद्यार्थी फुटलेल्या बंधार्‍यात उभे राहून आपला निषेध व्यक्त करणार आहेत.

या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी रायगड यांची भेट घेण्याचा प्रयत्न श्रमिक मुक्ती दलाच्या शिष्टमंडळाने केला, पण भेट होऊ शकली नाही. या शिष्टमंडळात विनायक पाटील, नंदकुमार गंगाराम पाटील, प्रा. सुनील नाईक, नंदन पाटील धेरंड, निवास पाटील, मधुरा पाटील आदींचा समावेश होता.

या फुटलेल्या बंधार्‍यामुळे मोठे शहापूर, धेरंडमध्ये गेले वर्षभर महिला रात्री 1 ते 4 वाजेपर्यंत जाग्या राहात आहेत. पाणी कधीही रात्री घरात शिरेल, अशी भीती कायम आहे. चुली पाण्यात आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनी (दि.1) सकारात्मक बैठक घेऊन आठ दिवसांत येणारे पाणी थांबवा, असे निर्देश दिले होते. परंतु, गुढीपाडव्याला उधाणाचे पाणी पुन्हा घरांच्या पायरीपर्यंत आले असल्याचे श्रमिक मुक्ती दलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

याबाबत एमआयडीसीने ना संवाद साधला, ना प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. ज्या शेतकर्‍यांनी जमिनी विकल्या नाहीत, तसेच संपादनामध्ये नाहीत, अशा शेतीतदेखील हे खारे पाणी घुसून जमीन नापिक झाली आहे. त्यामुळे या जमिनीत मिळणारा रोजगारदेखील बुडाला आहे. त्याचबरोबर मत्स्य तलावात पाणी घुसून निमखारे पाणी पूर्ण खारे होऊन मासे मृत पावत आहेत. तलावाचे पाणी व गोडे पाणी यामध्येदेखील पाणी मिसळून खारे बनले आहे. या पुढील सर्वच उधाणे दिवसा येणार आहेत व त्यातून उर्वरित जमीन वाचवण्यासाठी फुटलेला बंधारा बांधवा म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्या बंधार्‍यामध्ये उभे राहून सर्वच यंत्रणांचा निषेध करण्याचे ठरवले आहे. प्रत्येक वेळेला आंदोलन जाहीर केले की प्रांत अधिकारी जनतेची समजूत करतात व आंदोलन आम्ही मागे घेतो, पण त्यातून प्रश्‍न तसेच राहतात, असे आमच्या लक्षात आले असल्याची टीकाही या पत्रकातून करण्यात आली आहे.

Exit mobile version