। गडचिरोली । प्रतिनिधी ।
गडचिरोली जिल्ह्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. गावात प्रसुतीची सोय नसल्याने एका नऊ महिन्यांच्या गर्भवती मातेला प्रसूतीसाठी तब्बल सहा किलोमीटरची पायपीट करावी लागली. या शारीरिक त्रासामुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीत आधी पोटतील बाळ दगावले आणि काही वेळातच मातेनेही अखेरचा श्वास घेतला. ही घटना शुक्रवारी (दि.2) पहाटे घडली.
एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील आशा संतोष किरंगा (24) ही नऊ महिन्यांची गर्भवती होती. आलदंछी हे तालुका मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. दरम्यान, प्रसववेदना जाणवताच तातडीने दवाखान्यात जाता यावं यासाठी 1 जानेवारीला आशा किरंगा ही पती संतोषसोबत जंगलाच्या वाटेने 6 किलोमीटरची पायपीट करत पेठा येथील आपल्या बहिणीच्या घरी निघाली होती. मात्र पायपीटमुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजता त्यांना तीव्र प्रसववेदना सुरू झाल्या. तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना हेडरी येथील कालीअम्माल रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी सिझेरियनचा निर्णय घेतला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पोटातच बाळाचा मृत्यू झाला होता आणि वाढलेल्या रक्तदाबामुळे काही वेळातच आशा यांचाही मृत्यू झाला.
मृत्यूनंतरही या माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड थांबली नाही. उत्तरीय तपासणीसाठी बाळ व मातेचे शव हेडरी येथून एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, तेथे स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने पुढे 40 किलोमीटरवरील अहेरीला पाठवावे लागले. अहेरी येथील ग्रामीण रुग्णालयात 2 जानेवारी रोजी दुपारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे स्वाधीन केले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दुर्गम भागातील रस्ते, आरोग्य केंद्रे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता यामुळे निष्पाप जीव गमवावे लागत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने पायाभूत सुविधा मजबूत कराव्यात, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.







