| पुणे | प्रतिनिधी |
पंढरपूर येथील नवीन कुंभार गल्लीत राहणाऱ्या आईसह मुलाची कोयत्याने वार करून हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 15) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. सुरेखा संजय जगताप (60), लखन संजय जगताप (24) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
संजय हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे ते मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घरी परतले, तेव्हा घराला बाहेरून कडी लावलेली होती. घर उघडून आत जाताच त्यांना मुलगा लखन आणि पत्नी सुरेखा हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. तसेच फॉरेन्सिक टीम व श्वान पथकाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. लखन आणि सुरेखा जगताप यांची हत्या नक्की कोणी केली? कुठल्या कारणावरुन झाली? याबाबत कुठलीच ठोस माहिती अद्याप पुढे आली नाही. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाल्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी सांगितले.






