उपकार नको काम हवे, 79 वर्षीय आई व तिच्या मुलाचा आर्त टाहो
| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
समाजामध्ये आहे रे आणि नाही रे असे दोन वर्ग आहेत. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे खूप काय आहे आणि काहींना अन्न, वस्त्र, निवारा हेसुद्धा भागवता येत नाही. मात्र त्यामध्ये अनेकांच्या अंगी स्वाभिमान अंगीकृत असतो. मदतीऐवजी ते दोन हातांना काम मागतात. याचा प्रत्यय नवीन पनवेल येथे राजीव गांधी मैदानाच्या समोर एक 79 वर्षाची वृद्ध आई आणि 54 वर्षाचा तिचा मुलगा या पदपथावर राहणाऱ्या मायलेकांच्या आर्त टाहोवरून गेल्या सहा महिन्यापासून अनेकांना आला. भाडे थकल्यामुळे घरमालकांनी बाहेर काढल्यानंतर आई व मुलावर ही परिस्थिती ओढवली आहे.
80 व्या वर्षांमध्ये पदार्पण केलेल्या विमल पवार यांचा जन्म मुंबईमधील गोरेगावचा. अत्यंत सधन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचा विवाह मूळचे सातारा येथील मात्र मुंबईत वास्तव्य असलेल्या पवार कुटुंबात झाला. विमल यांचे पती लेखापाल म्हणून काम करत होते. तर महेश पवार हा मुलगा खासगी ठिकाणी कामाला होता. पतीच्या अकाली निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी आलेला महेश मिळणाऱ्या पगारावरती आपलं घर चालवत होता. मात्र अचानक नोकरी गेल्याने ते आर्थिक विवंचनेमध्ये गेले. त्यानंतर पवार हे आपल्या आईला घेऊन पनवेलमध्ये एका गावात भाड्याच्या खोलीत राहायला आले. पण येथेही हवे तसे काम न मिळाल्याने वेळेत भाडे भरणे शक्य न झाल्याने घर मालकाकडून देण्यात आलेल्या त्रासाला कंटाळून महेश यांनी आईला घेऊन वृद्धाश्रमात राहण्याचा निर्णय घेतला. वृद्धाश्रमात होणाऱ्या गैरसोईला कंटाळून तसेच घर भाडे भरण्यासाठी पैसे नसल्याने सध्या ही आई आणि लेकाची जोडी नवीन पनवेल येथील आदई सर्कल या ठिकाणी असलेल्या पदपथावर रहात आहे. विचारपूस करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी मदत करण्याची इच्छा दर्शवल्यास उपकार नको काम द्या, अशी मागणी ते त्यांच्याकडे करतात.
वृद्धाश्रम बंदीवास
पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकजण मदत करण्याची इच्छा त्यांच्याकडे व्यक्त करतात. काही जण वृद्धाश्रमात राहण्याची व्यवस्था करतो, असेही सांगतात. पण वृद्धाश्रमातील बंदिवासात राहण्याची इच्छा आम्हाला नसल्याने तब्येतीला झेपेल असे काम मिळाल्यास त्यातून मिळणाऱ्या पगारातून भाड्याच्या घरात राहण्याची इच्छा ते व्यक्त करतात.
अनेकांकडून जेवणाची मदत
सहा महिन्यापासून फुटपाथवर राहत असल्याने अनेकजण स्वखुशीने जेवणाची आणि नाष्ट्याची सोय करत असल्याची माहितीदेखील पवार यांनी दिली असून, घर मिळवून देण्याचे आश्वासनदेखील काहींनी दिल्याची माहिती त्यांनी दिली.
मी महाडिकांची मुलगी
79 व्या वर्षीदेखील खंबीर दिसत असलेल्या विमल पवार आपण साताऱ्यातील महाडिक कुटुंबात जन्माला आलो असून मराठा असल्याचे अभिमानाने सांगतात
