चौलमळा येथे आई कृष्णादेवीचा उत्सव

दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम, रात्री स्वराविष्कार ऑर्केस्ट्राचे आयोजन

। चौल । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील चौलमळा गावची ग्रामदेवता आई कृष्णादेवीचा उत्सव सोहळा मंगळवार, दि. 2 मे रोजी पार पडणार आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सालाबादप्रमाणे होणारा चौलमळा येथील आई कृष्णादेवीचा उत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मंगळवार, 2 मे रोजी सकाळी 8 वाजता कृष्णादेवीच्या पालखी सोहळ्याने कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. आई कृष्णादेवीच्या मुखवट्याची मधुकर नाईक यांच्या घरापासून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर मंदिरात सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

सायंकाळी सात ते रात्रौ नऊ वाजेपर्यंत श्री. कृष्णादेवी प्रासादिक भजन मंडळ, चौलमळा बुवा चंद्रकांत नवगावकर यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना अजय वाडकर आणि विकास पाटील पखवाज वादक म्हणून साथसंगत करणार आहेत. रात्रौ नऊ वाजता ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी अलिबाग येथील ‘आई तुझं देऊळ..’ फेम योगेश आग्रावकर प्रस्तृत ‘स्वराविष्कार’ हा मराठी-हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे.

तरी, सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चौलमळा गावचे सरपंच रवींद्र घरत, उपसरपंच जितेंद्र पाटील, कृष्णादेवी युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र नाईक, उपाध्यक्ष अल्पेश म्हात्रे, भजन मंडळ अध्यक्ष संदीप घरत, महिला मंडळ अध्यक्ष प्रमिता पाटील यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवक मंडळाचे सर्व सभासद, ग्रामस्थ, महिला मंडळ अहोरात्र मेहनत घेत आहेत.

Exit mobile version