| चिरनेर | प्रतिनिधी |
तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेत उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा मोठीजुई शाळेने दैदीप्यमान यश मिळवले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केलेल्या अथक परिश्रमाचे फळ म्हणून शाळेला 2025-26 या वर्षी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान मिळाला आहे. या अगोदर देखील शाळेला प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
निसर्गाचे महत्त्व आणि शेतीची आवड विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळांसाठी परसबाग स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत तालुक्यातील अनेक नामांकित शाळांनी सहभाग घेतला होता. मात्र, मोठीजुई शाळेच्या परसबागेने भाजीपाला, फुलझाडे, मसाल्याचे पदार्थ,आणि औषधी वनस्पतींच्या लागवडीतील वैविध्य तसेच बागेची उत्तम निगा राखण्याच्या निकषांवर परीक्षकांची मने जिंकली.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी या यशाचे श्रेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांना दिले आहे. “या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ शेतीचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळाले नाही, तर त्यांच्यात जबाबदारीची आणि निसर्गाबद्दलची आस्था देखील वाढली,“ असे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.
शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी, शाळा व्यवस्थापन समितीने आणि शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. या यशामुळे मोठीजुई शाळेने तालुक्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या परसबागेसाठी उपक्रमशील शिक्षक अविनाश नवाळे, कौशिक ठाकूर, यतीन म्हात्रे, विश्वनाथ गावंड, दर्शन पाटील, अंकुश पाटील, शर्मिला पाटील, काजल पाटील यांनी मेहनत घेतली.






