उरण पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने आयोजन
| उरण | प्रतिनिधी |
पोलीस सहआयुक्त, नवी मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय सागरी सुरक्षा समन्वय समितीच्या बैठकीत सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस ठाणे स्तरावर मोटारसायकल रॅली/मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने दि. 20 मार्च रोजी संध्याकाळी 6.15 ते 7.05 यावेळेत उरण-न्हावाशेवा-मोरा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील सागर रक्षक दल सदस्य, मच्छिमार बांधव आणि पोलीस अंमलदार यांच्या संयुक्त सहभागाने उरण पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
ही मोटारसायकल रॅली पेन्शन्स पार्क, उरण येथून सुरू होऊन म्हातवली, नागाव, पिरवाडीमार्गे एस.टी. स्टँड चारफाटा, करंजा गाव आणि करंजा जेटीमार्गे उरणपर्यंत काढण्यात आली. रॅलीदरम्यान, सागर रक्षक दल सदस्य, मच्छिमार बांधव आणि पोलीस अंमलदारांनी सागरी सुरक्षेबाबत जनजागृती केली. यावेळी कोस्टल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1093 चे टी-शर्ट परिधान करून आणि माहितीपत्रके वाटून जनतेमध्ये सुरक्षा जागरूकता निर्माण करण्यात आली.
या मोटारसायकल रॅलीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, तसेच उरण, न्हावाशेवा आणि मोरा सागरी पोलीस ठाण्यांचे पोलीस अंमलदार, एकूण 45 सागर रक्षक दल सदस्य आणि मच्छिमार बांधव सहभागी झाले होते. रॅली शांततेत आणि शिस्तबद्धरित्या पार पडली.