| पोलादपूर । वार्ताहर ।
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये धामणदिवी गावाच्या हद्दीमध्ये मंगळवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास अज्ञात चालकाने चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करून समोरून येणार्या मोटारसायकलस्वारास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रक घटनास्थळी सोडून चालक पसार झाला आहे. जिल्ह्यातील पोलादपूर ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यांच्या सीमवर्ती भागात असलेल्या महामार्ग पोलीस केंद्र, कशेडीच्या हद्दीमध्ये मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक 66 वर धामणदेवी गावच्या हद्दीत घाटामध्ये आज मंगळवार दि.19 एप्रिल2022 रोजी सकाळी पावणेसात वाजण्याच्या दरम्यान तळोजा ते लोटे जाणारा ट्रक क्रमांक एमएच 04 डीके 7258 वरील अज्ञात चालकाने ओव्हरटेक करून राँग साईडला जाऊन समोरून पेढांबे चिपळूण ते मुंबइकडे मोटर सायकल एमएच-08-एव्ही-3726 घेऊन जाणारा मोटारसायकलस्वार अथर्व मोहन सावंत (वय-25 वर्षे, रा.पेढांबे, ता. चिपळूण, जि.रत्नागिरी) यांच्या मोटरसायकलला जोरदार ठोकर देऊन अपघात केला. या अपघातामध्ये मोटारसायकलस्वार अथर्व मोहन सावंत याचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळी पोलादपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी आले असून त्यांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय पोलादपूर या ठिकाणी पाठविला. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक ट्रक अपघातस्थळी पळून गेला असून अपघातस्थळी एकेरी वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. कशेडी टॅप पोलीस ठाण्याचे पीएसआय चांदणे यांनी याकामी तातडीने प्रयत्न केले.