रेल्वे फाटकामुळे वाहन चालकांचे हाल

मालवाहक गाड्यांमुळे नागरिक त्रस्त; त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी

। नागोठणे । वार्ताहर ।

नागोठण्यातील पुनर्वसित वसाहत जोगेश्‍वरी नगरमधील नागरिकांसह विद्यार्थ्यांना सध्या एका वेगळ्याच समस्येने ग्रासले आहे. जोगेश्‍वरी नगरच्या रेल्वे फटकामध्ये खूप वेळ थांबणार्‍या मालगाड्यांचा मोठ्या प्रमाणावर त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या मालगाड्यांमुळे आजारी व्यक्तीला नागोठण्यात उपचारासाठी नेताना चांगलाच खोळंबा होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्‍वर साळुंखे यांच्यासह येथील नागरिकांनी केली आहे.

मध्य रेल्वेचे महत्वाचे मध्यवर्ती स्थानक असलेल्या नागोठणे रेल्वे स्थानकाजवळच जोगेश्‍वरी नगर (गावठाण)हे रेल्वे फाटक आहे. नागोठण्याच्या पूर्वेकडील बाजूला को.ए.सो. बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुल असून जंगल भागात वासगाव, पिंपळवाडी व लावेचीवाडी ही आदिवासी वस्ती असलेली गावे आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना नागोठण्यात पायी चालत जाण्यासाठी पादचारी पूल आहे. परंतु, वाहनांना जोगेश्‍वरी नगरच्या रेल्वे फटकातूनच जावे लागते. जोगेश्‍वरी नगरचे हे रेल्वे फाटक नागोठणे रेल्वे स्थानकापासून एकदम जवळच असल्याने या स्थानकातून मोठ्या प्रमाणात जाणार्‍या लांब पल्ल्याच्या व प्रवासी गाड्या ये-जा करत असल्यामुळे वारंवार हे फाटक बंद करण्यात येत असते. तर, काही वेळेला नागोठणे स्थानकात न थांबता जाणार्‍या लांब गाड्या येपर्यंत हे रेल्वे फाटक बंदच ठेवण्यात येते.

त्याचबरोबर नागोठणे रेल्वे स्थानकात विविध प्रकारचा अवजड माल घेऊन येणार्‍या मालगाड्या माल खाली करताना ट्रॅक बदलण्यासाठी जोगेश्‍वरी नगरच्या याच रेल्वे फटकात येत असतात. त्यावेळी हे रेल्वे फाटक बंद करण्यात येते. या मालगाडी खुप वेळ फाटकाच थांबत असल्याने येथून जाणार्‍या वाहन चालकांना खूप वेळ याठिकाणीच अडकून रहावे लागते. काही महत्वाचे काम असेल तर नागरिकांना खूपच मनस्ताप सहन करावा लागतो. तर आजारी व्यक्तीला उपचारासाठी नागोठण्यात घेऊन जात असताना या बंद फरकामुळे खोळंबून रहावे लागते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने उपायोजना करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

मालगाड्यांचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागेल
नागोठणे रेल्वे स्थानकातील मालगाड्या ज्या ट्रॅकवर अवजड माल उतरविण्यासाठी येतात त्या ठिकाणच्या रेल्वे यार्डचे काम सुरू आहे. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांतच नागोठणे रेल्वे स्थानकातील रेल्वे यार्डचे हे काम पूर्ण होणार असल्याने जोगेश्‍वरी नगरच्या फाटकात थांबणार्‍या मालगाड्यांचा प्रश्‍न मार्गी लागेल, असे रेल्वेच्या नागोठणे स्थानकातील स्टेशन व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे.
Exit mobile version