रिलायन्स विरोधात आंदोलन; 40 आंदोलकांवर कारवाई

। नागोठणे । वार्ताहर ।
रिलायन्सच्या कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार्‍या प्रकल्पग्रस्तांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 40 आंदोलकांवर नागोठणे पोलिसांनी कारवाई केली आहे. या आंदोलकांना रोहा येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात मंगळवारी(दि.16) दुपारी हजर करण्यात आले. यामध्ये 40 पुरुष प्रकल्पग्रस्त आंदोलकांचा समावेश होता. याबाबतीत न्यायालयाचा निर्णय उशीरापर्यंत समजू शकला नाही.

विविध मागण्यांसाठी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या वतीने वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून व वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स गेट बंद आंदोलनाचा लढा सोमवारी (दि.15) देण्याचे ठरविले होते. रिलायन्स कंपनीच्या मेन गेट पासून 200 मीटर अंतरापर्यंत प्रवेश करण्यास कंपनीने न्यायालयाकडून निर्बंध आणल्याने प्रकल्पग्रस्त आंदोलक मेन गेट जवळील कडसुरे गावाच्या प्रवेश द्वारात बसून हे आंदोलन सुरु ठेवले होते.

मात्र दिवसभरात कोणताच समाधानकारक तोडगा न निघाल्याने व आंदोलनस्थळी उपस्थित असलेले अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी विनंती करूनही संध्याकाळ पर्यंत हे आंदोलन मागे न घेतल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांना सायंकाळी 5.30 वा. सुमारास ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावेळी 40 पुरुष व 30 महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांना रोहा येथील मातोश्री मंगल कार्यालयात ठेवण्यात आले होते. त्यापैकी 30 महिला आंदोलकांना नोटीस देऊन त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देऊन सोमवारी रात्रीच सोडण्यात आले होते.

Exit mobile version