भीमशक्तीचे महाडमध्ये ठिय्या आंदोलन

भूमिहीन शेतकऱ्यांना रेडीरेकनर दर वाढवून मिळावा

| महाड | वार्ताहर |

भूमिहीन शेतकऱ्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना आणि बिरसामुंडा आदिवासी सबलीकरण योजनांचा लाभ घेण्यासाठी कोकणातील जमिनींचे रेडिरेकनर दर वाढवून मिळावेत आणि इतर मागण्यांसाठी भीमशक्तीचे गोपाळ तंतरपाळे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

भूमिहीन शेतमजुरांना एसटी आणि एसटी प्रवर्गांना घटनेने दिलेले न्याय्य हक्क मिळावे या मागणीसाठी संघटनेचे सरचिटणीस गोपाळ तंतरपाळे यांनी महाडमधील चवदार तळे येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. संविधान दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन छेडण्यात आल्याचे तंतरपाळे यांनी सांगितले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना आणि बिरसा मुंडा आदिवासी सबलीकरण स्वाभिमान योजना या योजनांचा लाभ एससी आणि एसटी प्रवर्गाला मिळतो. मात्र, याकरिता लागणारी जमीन शासनाकडून संपादित केली जाते. कोकणात जमिनींचे दर वाढले, मात्र रेडीरेकनरचे दर कमी असल्यामुळे लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेता येत नाही. यामुळे महाड, दापोली, पंधेरी येथील 412 एकरची फाईल तसेच श्रीवर्धन येथील 105 एकरची फाईल मंत्रालयामध्ये प्रलंबित आहे. शासनाने रेडीरेकनरचे दर वाढवून दिले पाहिजे, अशी मागणी वारंवार करूनदेखील याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गोपाळ तंतरपाळे यांनी अखेर या आंदोलन सुरू केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी आमच्या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने विचार करून भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे अन्यथा येत्या मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले, जाईल असा इशारादेखील गोपाळ तंतरपाळे यांनी दिला. चवदार तळे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून गोपाळ तंतरपाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. महाड तहसीलदार, समाज कल्याण विभाग आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांनी भेट घेऊन गोपाळ तंतरपाळे यांच्याजवळ चर्चा केली असली तरी वरिष्ठ पातळीवर जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे गोपाळ तंतरपाळी यांनी सांगितले.

Exit mobile version