| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड शहरातील जुना पाडा महादेव कोळी समाज मुरुड सिटी सर्वे नंबर 65/2 या कोळी लोकांचे बिन आकारी होळीचे मैदान असून, येथे मुरुड नगरपरिषदेचे गटाराचे बांधकाम सुरु असतानाच काळभैरव देवस्थान मंदिर ट्रस्ट भंडारी समाज मुरुड यांनी गटाराच्या मूळ बांधकामात अनधिकृतपणे लोखंडी खांब उभे केले आहेत. सदरील लोखंडी पोल तातडीने काढून टाकण्याची मागणी कोळी समाजाने केली होती. नगरपरिषदेकडून कोणताच सकारत्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर नियोजित निवेदनाप्रमाणे गुरुवारी कोळी समाजाने असंख्य महिला व पुरुष यांच्यासोबत मुरुड नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते.
यावेळी कोळी समाजातील लोकांनी आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे, लोखंडी पोल काढलेच पाहिजे. कोळी समाज एकजुटीचा विजय असो असे फलक हातात घेण्यात आले होते. मुरुड नगपरिषदेवर लोक जमा होताच कोळी समाजाच्या महिला अध्यक्ष उषा बोरजी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, तहसीलदार व नगरपरिषद लावलेले लोखंडी पोल हे बेकायदेशीर असल्याचे मान्य करतात; परंतु कार्यवाही करीत नाहीत. सदरची जमीन सरकारी असेल तर मग भंडारी समाजाला लोखंडी पोल लावण्याचा अधिकार कोणी दिला.2020 सालापासून आम्ही निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आज आम्हाला ठिय्या आंदोलन करावे लागत आहे. भंडारी समाजाने पोल काढून टाकावे, असे त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी माजी नगरसेवक पांडुरंग आरेकर,श्याम चोरढेकर, नवा पाडा समाज अध्यक्ष यशवंत सवाई,उपाध्यक्ष ऋषिकेश बैले,मनोहर बैले,आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी पोलीस व महसूल विभागाकडून कार्यवाही होऊन महसूल विभागाने मूळ जागा मालक या भूमिकेतून आदेशित केल्यावर सदरचे पोल तात्काळ काढून टाकण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र कोळी समाजास दिल्याने ठिय्या आंदोलनाची सांगता करण्यात आली.