सुधागड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नवी संधी
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
राज्य शासनाच्या कृषी विभागाने नुकतेच ‘महाविस्तार ॲप’ विकसित केले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला डिजिटल सेवेच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध आणि रिअल-टाइम कृषिविषयक सल्ला देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे हा या ॲपचा उद्देश आहे.
या ॲपवर हवामान, माती, कृषी सल्ला, खाद-बियाणे, किड-रोग नियोजन, बाजारभाव, बाजारपेठ तसेच विविध शासकीय योजनांची माहिती एकत्रितपणे उपलब्ध आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेतील चॅटबॉटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थानिक व त्यांच्या गरजेनुसार सल्ला सहज मिळू शकतो. क्लिष्ट माहिती आणि शेतीतील व्यवहार्य निर्णय यातील दरी दूर करण्याचे काम महाविस्तार करते. शाश्वत शेती, डिजिटल सक्षमीकरण आणि समृद्ध गावे या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या ॲपचा वापर करून उत्पादन खर्चात कपात होऊन उत्पन्नात वाढ कशी साधता येईल, यासंदर्भात शास्त्रशुद्ध माहिती देण्यात आली. तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲप इंस्टॉल करून आपल्या शेतीमध्ये त्याचा वापर करावा. ॲपमधील विविध मेनूंचा प्रत्यक्ष वापर करून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतून अधिक लाभ मिळवता येईल, असे त्यांनी सांगितले.







