शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपावर घणाघात

‘विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा लावणे भाजपाची नवी संस्कृती’

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. अमोल किर्तीकर यांच्यावर कोरोना काळात खिचडी वाटपात गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला अमोल किर्तीकर यांचे वडील विद्यमान खा. गजानन किर्तीकर हे शिंदे गटात गेलेले आहेत. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार करू, असे दोनच दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र, गुरुवारी (दि.12) गोरेगावमध्ये झालेल्या एका प्रचारसभेत त्यांनी मुलगा अमोल किर्तीकर यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा निषेध केला. तसेच पंतप्रधान मोदींवर शरसंधान साधले.

प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले, शिवसेनेत मला 57 वर्ष झाली. पण मी कधी लबाडी किंवा कपट-करस्थान मी कधीच केलं नाही. अमोल किर्तीकर विरोधात मी प्रचार करणार हे जाहीर केले होते, त्याप्रमाणे मी त्यांच्याविरोधात प्रचार करणार आहेच. पण अमोल किर्तीकर यांच्याविरोधात सुरू असलेल्या ईडी चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही. भाजपाने यंदा ‘400 पार’ असा नारा दिला आहे. त्यांनी 400 जागांऐवजी संसदच ताब्यात घ्यावी, पण दुसऱ्या बाजूला विरोधकांचाही सन्मान ठेवावा, अशा शब्दात त्यांनी भाजपावर शरसंधान साधले. विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे, ही भाजपाने आणलेली नवी संस्कृती असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

किर्तीकर यांच्या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी त्याचा आधार घेत भाजपावर टीका केली. एकनाथ शिंदे यांच्या गटाला कशाचा धाक दाखवून आपल्याबरोबर घेतले गेले, याचा अनुभव किर्तीकर यांनी सांगितला आहे. किर्तीकर यांचं म्हणणं फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचं काम कसं झाले, हे किर्तीकर यांनी त्यांच्या शब्दात सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्राने त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

Exit mobile version