खा. संजय दिना पाटलांची पत्रकारांना धमकी

| मुंबई | प्रतिनिधी |

माझ्या नादाला लागू नका. मी पाच लोकांना ठार मारलंय, असं म्हणत उघड धमकी देणाऱ्या शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना पातळी सोडली आहे. धमक्या देण्याच्या ओघात पाच जणांना ठार केल्याची अप्रत्यक्ष कबुली देणाऱ्या पाटलांनी आज पत्रकारांना थेट शिवीगाळ केली. रेकॉर्ड करा आणि आयुक्तांना दाखवा, अशा शब्दांत खासदार संजय पाटलांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

माध्यमांचे प्रतिनिधी खासदार संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया घेत होते. काही वेळ पत्रकारांशी संवाद साधल्यावर पाटलांचा पारा अचानक चढला. मी तुमच्याशी दोन मिनिटं बोललो ना आता. आता तुम्ही अति करताय.. बंद कर आता.. नाही तर मी विसरुन जाईन मी खासदार आहे. इज्जत करतोय, इज्जत करा. तुम्ही उगाच माझ्या *% बोट घालताय. हे रेकॉर्ड करा. तुमची इज्जत करतो. उगीच डोक्यात जाऊ नका. आता परत आला तर मारुन पाठवणार तुम्हा लोकांना. जे लिहायचंय ते लिहा. रेकॉर्ड करुन आयुक्तांकडे तक्रार करा. खूप दिवस सहन केलं, असं म्हणत संजय दिना पाटलांनी पत्रकारांना आईवरुन शिवीगाळ केली.
आता येऊ नका माझ्याकडे. आलात तर मारणार, अशी थेट धमकीच त्यांनी पत्रकारांना दिली. मी आता जे बोलतोय, ते रेकॉर्ड करुन ठेवा. तुम्ही आता माझ्याकडे विचारायला आलात तर मार खाणार. हे लिहून घ्या. रेकॉर्ड करा. माझ्याकडे आलात तर मार खाणार. काय तक्रार करायची आहे ती करा. पोलिसांसमोर सांगतोय. बस झालं आता, खूप सहन केलं, अशा शब्दांत पाटलांनी पत्रकारांना धमकावलं. अवघ्या चार दिवसांपूर्वी शिंदेसेनेत गेलेल्या, सत्ताधारी झालेल्या पाटील यांनी पत्रकारांना थेट मारुन टाकण्याची धमकी दिली.

शिंदेसेनेत गेल्यापासून संजय पाटील वादात
दोन दिवसांपूर्वीही संजय पाटील यांनी धमकीची भाषा वापरली होती. माझ्या नादाला लागू नका. मी याआधी पाच लोकांना ठार केलंय आणि आता आंदोलन केल्यास घरात घुसून बॉम्ब टाकेन, अशी थेट धमकी खासदार पाटील यांनी दिली होती. याप्रकरणी शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहिलं आहे. संजय पाटलांवर कारवाई करा, अन्यथा मला कोर्टात जावं लागेल, असा सूचक इशारा राऊतांनी पत्रातून दिला आहे.
Exit mobile version