। खोपोली । प्रतिनिधी ।
मंगेश काळोखेच्या हत्येचा प्रकार अत्यंत निंदणीय आहे. या घटनेते सुधाकर घारे आणि भरत यांचा कोणताही संबंध नसताना राजकीय वैमनस्यातून विरोधक आरोप करीत आहेत. या हत्येचा तपास करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी सहकार्य करू, तसेच या हत्येचा तपास एसआयटीच्या माध्यमातून करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असून, त्यानंतर हत्येच्या घटनेनंतर काय घडले ते सर्व बाहेर येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी संयम पाळवा, प्रतिक्रिया देणे टाळावे, असे आवाहनही खा. तटकरे यांनी केले आहे.
खोपोलीत शिंदे गटाचे नेते मंगेश काळोखे यांचा निर्घृण खून झाला आहे. या खुनाचा कट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ता भरत भगत यांनी केलाचा आरोप शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला असून, काळोखे यांचे पुतणे राज काळोखे यांच्या तक्रारीनुसार घारे आणि भगत यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. सुधाकर घारे, भरत भगत यांचे नाव राजकीय वैमनस्यातून गोवले असल्याची प्रतिक्रिया उमटत असताना, या घटनेविरोधात कार्यकर्त्यांनी आक्रमकपणाची भूमिका घेऊ नये यासाठी खा. सुनील तटकरे यांनी कर्जत येथील राष्ट्रवादी भवनात महिला कार्यकर्त्यांची भेट घेऊन संयम राखण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उबाठाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, कुंडलिक (बंधू) पाटील, प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष सुनील पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे, महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंढे, कर्जत नगरपरिषद नगराध्यक्षा पुष्पा दगडे, खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, कर्जत तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे यांच्यासह राष्ट्रवादी पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सुधाकर घारे यांनी मी अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांचा कर्जत, खालापुरातील जनमानसात आदर आहे, त्यामुळे ते असे घाणेरडे कृत्य करणार नाहीत, याची मला शाश्वती आहे. मंगेश काळोखे यांची झालेली हत्या अत्यंत निंदणीय आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल हत्येचा निष्पक्ष तपास करून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यासाठी सहकार्य करतील, असा मला विश्वास आहे. परंतु, या हत्येच्या घटनेत माझ्या नावासहीत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जातात, तरीही मी संयम पाळतो. कारण, न्याय देवतेवर आणि पोलिसांच्या तपासावर विश्वास आहे. त्यामुळे सुधाकर घारे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संयम पाळावा, असे आवाहन खा. तटकरेंनी केले आहे.
आरोपींवर कठोर कारवाई करणार मुलीला शाळेत सोडताना हल्लेखोरांनी हल्ला केला. पूर्णपणे नियोजन करुन मंगेशची हत्या केली. हा नियोजित कट आहे. त्याच्या परिवाराच्या, इथल्या जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत. या प्रकरणात जे आरोपी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. हे प्रकरण फास्टट्रॅकवर घेऊन, सरकारी वकील देऊन, मोक्का अंतर्गत कारवाई करुन सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली झाली पाहिजे, अशी पीडित कुटुंबियांची भावना आहे. अशा प्रकारची वृत्ती ठेचून काढली पाहिजे, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली. शुक्रवारी झालेल्या काळोखे यांच्या हत्येनंतर त्यांनी शनिवारी खोपोलीत काळोखे कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
