खा. सुनील तटकरे यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेबाबत सोशल मिडीयावर वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य केले जात आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेचा काळा दिवस असल्याचे सोशल मिडीयावर बोलले जात आहे. याबाबत प्रतिक्रीया देताना खासदार सुनील तटकरे यांनी काळा दिवस कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित करीत भाजप व राष्ट्रवादीसाठी हा दिवस सुराज्याचा पांढरा दिवस असून जनतेच्या सेवेसाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे स्पष्टीकरण केले. तटकरे यांच्या या विधानांतर जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली असून हा टोला नक्की कोणाला आहे, याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे.
रायगड जिल्हा परिषदेची निवडणुक महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गट वेगवेगळे लढले. शिंदे गटाने आपली सत्ता जिल्हा परिषदेवर येण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. अध्यक्षही शिंदे गटाचाच असणार, अशा जाहीरातबाजीदेखील वेगवेगळ्या माध्यमातून करण्यात आल्या. राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपूत्र विकास गोगावले यांचे नाव या पदासाठी घेतले जात होते. मात्र, शिंदे गटाचा सर्व डाव भाजप आणि राष्ट्रवादीने हाणून पाडला. भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष ठाकरे गट आणि काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात होते. त्यामुळे शिंदे गटावर मोठी नामुष्की ओढण्याचे चित्र होते. अखेर शिंदे गटाने नमते घेत जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत सहभाग घेतला. शिंदे गटाला सुरुवातीला अध्यक्षपदासाठी अडीच वर्षे पाहिजे होती. परंतु, भाजप व राष्ट्रवादीने त्यांची ही मागणी फेटाळून भाजपचे मंगेश वाकडीकर यांना अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी (दि.13) झालेल्या बैठकीत भाजपकडे अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्यात आले.
सत्ता स्थापनेनंतर सोशल मिडीयावर वेगवेगळे मेसेज व्हायरल होऊ लागले. त्यामध्ये एक मेसेज सत्ता स्थापनेचा दिवस काळा दिवस म्हणून टाकण्यात आले. त्यावर खा. तटकरे यांनी, हा काळा दिवस नेमका कोणासाठी? हे मला माहित नाही. त्या समाजमाध्यमांवरील पोस्टबाबत अनभिज्ञ आहे. भाजप आणि राष्ट्रवादी यांची निवडणूक पूर्व युती होती. जनतेने निवडून दिल्यामुळे लोकशाही मार्गाने सत्ता स्थापनेचा अधिकार आमच्याकडे होता. महायूतीच्या निर्णयाने शिवसेनाही सत्तेत सहभागी झाली. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा दिवस सुराज्याचा पांढरा दिवस असून जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे ते म्हणाले. तटकरे यांच्या या विधानांतर जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीसाठी हा दिवस सुराज्याचा पांढरा दिवस हे विधान शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांना झोंबले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेत शिंदे गट असतानाही त्यांना कितपत सन्मान राहिल, हे लवकरच जगजाहीर होणार आहे.






