अलिबाग शहरात महायुती आणि बंडखोरांच्या प्रचाराची टक्कर
| रायगड | खास प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील शिवाजी चौकात महायुतीच्या उमेदवारासाठी खासदार तटकरे यांनी गुरुवारी रात्री प्रचारसभा घेतली होती. त्यांचे भाषण सुरु असतानाच अचानक भाजपाचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांच्या प्रचाराचे वाहन तेथे आले. त्यामुळे खासदार तटकरे यांना भाषण थांबवावे लागले. महायुतीच्या गोटात शांतता पसरली होती, तर काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त झाल्याचे दिसून आले. यावेळी खासदार तटकरे यांनी आमदार दळवी यांचे विकासाच्या मुद्द्यावरुन कान पिळल्याचे दिसून आले.
अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या विरोधात महायुतीचे महेंद्र दळवी आणि भाजपाचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांच्यामध्ये खरी लढत होत आहे. मतदानाला आता काहीच दिवस शिल्लक असल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे. चिऊताई यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याने विरोधकांनी याचा धसका घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महायुतीच्या सभेत तटकरे यांनी आमदार दळवी यांचे विकासाच्या मुद्द्यावर कान पिळले. ‘माझे तुम्ही ऐकत नाही, त्यामुळे तुम्हाला तोटा होतो. मी सांगतो त्याप्रमाणे अलिबाग आणि मुरुडमधील विकासाची, रस्त्यांची कामे करा’, असे खासदार तटकरे यांनी भरसभेत आमदार दळवींना सुनावल्याचे दिसून आले.
अलिबाग, मुरुड आणि रोहा विभागात चिऊताई यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू व्यक्तिमत्त्व तसेच दूरदृष्टी असणारा उमेदवार म्हणून मतदार चिऊताई यांच्याकडे आशेने पाहात आहेत. मतदारसंघाचा त्याच विकास करु शकतील, अशी खात्री झाल्याने विविध प्रचारसभांमध्ये गर्दी वाढत असल्याचे दिसून येते.
पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे त्या अख्खा मतदारसंघ पिंजून काढत आहे. मतदारांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत. विशेष करुन युवा आणि महिला मतदारांच्या त्यांना सभेच्या ठिकाणी गराडा पडत आहे. चिऊताई यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा विरोधकांनी धसका घेतला असल्याचे दिसते. महायुतीच्या प्रचारसभांमधून सातत्याने टीका-टिप्पणी करण्यात येत आहे. परंतु, चिऊताई यांच्या भाषणांमध्ये अलिबाग विधानसभेचे व्हीजन उभे केले जात असल्याने ते मतदारांना अधिक भावत आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी गेल्या पाच वर्षांत जनतेसाठी कोणतेच ठोस काम न केल्याने या निवडणुकीत मतदार त्यांना नाकरण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा आहे.