खासदार पत्नी नीलिमा पाटील यांचा पराभव
| पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांनी तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परळी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करत असलेल्या खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी नीलिमा धैर्यशील पाटील यांचा पराभव झाल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर सुधागड तालुक्यात ‘गड आला पण सिंह गेला’ अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.
परळी जिल्हा परिषद गटात सन्मान समितीच्या शर्मिला शरद बोडके यांनी सौ. नीलिमा धैर्यशील पाटील यांचा दणदणीत पराभव केला. या लढतीत नीलिमा धैर्यशील पाटील यांना 7129 मते मिळाली, तर शर्मिला शरद बोडके यांना 10060 मते मिळून त्या 2931 मतांनी विजयी झाल्या. राज्यपातळीवरील मोठे नेतृत्व आणि संसदीय बळ असूनही झालेला हा पराभव भाजपसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरतो आहे.
जांभूळपाडा गणात मात्र भाजपच्या जागृती राजेश मानकर यांनी अतिश गोविंद सागळे यांचा पराभव करत भाजपला दिलासा दिला. जागृती मानकर यांना 4178, तर अतिश सागळे यांना 3365 मते मिळाली. त्या 813 मतांनी विजयी झाल्या. परळी गणात शिवसेना (उबाठा) गटाच्या प्रणिता राजेश परदेशी यांनी भाजपच्या सुनंदा विठ्ठल सिंदकर यांचा पराभव केला. प्रणिता परदेशी यांना 5683, तर सुनंदा सिंदकर यांना 3095 मते मिळाली. या लढतीत प्रणिता परदेशी 2588 मतांनी विजयी झाल्या.
राबगाव गणात भाजपच्या सुनीता किसन लेंडी यांनी मनिषा भरत डोके यांचा पराभव केला. सुनीता लेंडी यांना 4188, तर मनिषा डोके यांना 3242 मते मिळाली. त्या 946 मतांनी विजयी झाल्या. राबगाव गटात भाजपचे चंद्रकांत कृष्णा वारगुडा यांनी काशिनाथ ताया हंबीर यांचा पराभव करत 1874 मतांची आघाडी घेतली. वारगुडा यांना 9807, तर हंबीर यांना 7933 मते मिळाली. अडुळसे गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे संदेश परशुराम शेवाळे यांनी मिलिंद भिकू शेळके यांचा पराभव केला. शेवाळे यांना 5690, तर शेळके यांना 3672 मते मिळाली. ते 2018 मतांनी विजयी झाले.
एकूणच, या निकालांवर नजर टाकली असता, सुधागड तालुक्यात कोणत्याही एका पक्षाचे वर्चस्व दिसून येत नसून, मतदारांनी प्रत्येक गट व गणात वेगवेगळा निर्णय दिला आहे. मात्र, खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नींचा पराभव हा या निवडणुकांचा राजकीय केंद्रबिंदू ठरला असून, आगामी काळात तालुक्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा निकाल म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.







