कृषी ग्राहकांसाठी महावितरणचे वीजबिल दुरुस्ती शिबीर

। मुंबई । प्रतिनिधी ।
महावितरणच्या भांडूप परिमंडल अंतर्गत येत असलेल्या कर्जत खालापूर येथील कृषीपंप ग्राहकांच्या वीजबिल दुरुस्तीसाठी शुक्रवार 11 मार्च 2022 रोजी अलिबाग 1 व 2 विभागातील ग्राहकांसाठी उपविभागीय कार्यालय 1 व 2, अलिबाग (चेंद्रे गाव, सेंट मेरी चर्चच्या बाजूला), शनिवार, 12 मार्च 2022 रोजी कर्जत व खालापूर येथील ग्राहकांसाठी उपविभागीय कार्यालय कर्जत (कर्जत रेल्वे स्थानकाजवळ, भिसेगाव) येथे तसेच श्रीवर्धनच्या कृषीपंप ग्राहकांसाठी उपविभागीय कार्यालय श्रीवर्धन (एस. टी. स्टॅन्डच्या बाजूला, श्रीवर्धन) येथे मंगळवार दि. 15 मार्च 2022 रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य अभियंता, भांडूप परिमंडल, श्री सुरेश गणेशकर यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आवाहन केले आहे. सदर मेळाव्यात, मुख्य अभियंता,श्री.सुरेश गणेशकर स्वतः उपस्थित राहणार असून त्यांच्यासोबत पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. इब्राहीम मुलाणी, पनवेल ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. शिवाजी वायफळकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महावितरणच्या एकूण थकबाकीपैकी कृषी ग्राहकांची थकबाकी लक्षणीय असून कृषी ग्राहकांच्या हितासाठी महावितरणने मकृषिपंप वीज जोडणी धोरण 2020 म जाहीर केले होते. तरीदेखील, या धोरणाला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसून अनेक ठिकाणी चुकीच्या देयकांचा मुद्दा वारंवार लोकप्रतिनिधी, ग्राहक प्रतिनिधी तसेच ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येत आहे . या अनुषंगाने मुख्य कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे, भांडूप परिमंडल अंतर्गत अलिबाग, कर्जत-खालापूर व श्रीवर्धन येथील कृषीपंप ग्राहकांच्या वीजबिल दुरुस्तीसाठी अनुक्रमे दि. 11 मार्च, 12 मार्च व 15 मार्च 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, जास्तीत जास्त ग्राहकांनी याठिकाणी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. सदर, शिबिरामध्ये ग्राहकांच्या मंजूर वीजभार, मीटर वाचन, थकबाकी इत्यादी स्वरूपाच्या सर्व तक्रारींचे योग्य प्रकारे निराकरण करण्यात येईल. तरी, या संधीचा लाभ कृषिपंप ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version