एकाच दिवशी पकडले 63 वीजचोर
। कल्याण । वृत्तसंस्था ।
कल्याण परिमंडलात वीज चोरांविरुद्धची धडक मोहीम आणखी तीव्र होत आहे. नुकताच, डोंबिवली आणि डहाणू येथे स्वतंत्रपणे आखलेल्या मोहिमेत 63 वीजचोर आढळून आले असून, 37 ठिकाणी घडत असणारा अनधिकृत वीजवापर उघडकीस आला आहे.
संबंधितांना चोरी किंवा अनधिकृतपणे वापरलेल्या विजेचे देयक भरण्याबाबत नोटीसा बजावण्यात येत असून, भरणा टाळणार्यांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात येणार आहे.
याबाबत मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, डोंबिवलीतील नवापाडा, रेतीबंदर, देवी चौक, गरीबाचा पाडा, देवीचा पाडा, मोठा गाव परिसरात 399 वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात 19 ठिकाणी वीजचोरी तर 6 ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर आढळून आला. तर पालघर जिल्ह्यातील डहाणू उपविभागात 807 करण्यात आलेल्या वीज जोडण्यांची तपासणीत 44 ठिकाणी वीजचोरी तर 31 ठिकाणी अनधिकृत वीजवापर उघडकीस आला. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक अभियंते दीपक पाटील, किरण नागावकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंते धनराज बिक्कड, प्रताप माचिये यांच्या पथकांनी ही कारवाई केली.
ऑक्टोबर महिन्यात विशेष पथकाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोहिमेत कल्याण परिमंडलात 400 पेक्षा अधिक वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. यातील जवळपास 150 जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.