अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल नियमानुसारच महावितरणचे स्पष्टीकरण

। मुंबई । प्रतिनिधी ।
महावितरणच्या वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशाप्रमाणे हे बिल नियमानुसार असून, जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर वीजग्राहकांना दरवर्षी मिळणारी व्याजाची रक्कम वीजबिलामध्ये समायोजित केली जाते, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, आयोगाकडून करण्यात आलेल्या बहुवार्षिक वीजदराच्या निश्‍चितीकरणानुसार दि. 1 एप्रिलपासून नवीन वीजदर लागू करण्यात आले आहे. यामध्ये बहुतांश वर्गवारीचे दर सन 2021-22 मध्ये लागू असलेल्या वीजदराच्या पातळीवरच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सरसकट वीज दरवाढ झाल्याचा आरोपदेखील चुकीचा असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, महावितरणकडून बहुवर्षीय वीजदर विनिमय 2019 नुसार वीजदर ठरवून मिळावेत यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावासंबंधी मा. आयोगाने 30 मार्च 2020 रोजी आर्थिक वर्ष 2020-21 ते आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंतच्या 5 वर्षांच्या कालावधीसाठी बहुवर्षीय वीजदराचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार महावितरणच्या विविध ग्राहक वर्गवारीसाठी दि. 1 एप्रिल 2020 पासून लागू असणारे वीजदर निश्‍चित केले आहे.
सध्या दि. 1 एप्रिल 2022 पासून लागू असलेल्या वीजदरानुसार महावितरणकडून वीजबिलांची आकारणी करण्यात येत आहे. यातील बहुतांश वर्गवारीतील वीजदर मागील वर्षीच्या दराच्या पातळीवर ठेवण्यात आल्याने वीजग्राहकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.

 महावितरणकडून वीजग्राहकांना संबंधित आवश्यक सुरक्षा ठेवीमधील रकमेच्या फरकाची स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. तसेच जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर दरवर्षी स्वतंत्र परिपत्रक काढून व्याज देण्यात येत असते. त्यामुळे सुरक्षा ठेवीची बिल भरून सहकार्य करावे.

Exit mobile version