कल्याण-कर्जत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक

| नेरळ | प्रतिनिधी |

पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाचे बांधकाम सुरू असून, या रेल्वे मार्गावर खोदण्यात येणाऱ्या बोगद्याच्या कामामुळे स्थानिक वाहनचालकांची झोप उडाली आहे. बोगद्याच्या खोदकामात काढण्यात आलेली माती हे तेथून अन्यत्र हलविली जात असून, त्यामुळे कल्याण-कर्जत रस्ता निसरडा झाला आहे. ट्रकमधून चिखलमय माती नेणाऱ्या रस्त्यावर चिखल झाल्याने वाहनचालकांसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. पनवेल-कर्जत रेल्वेमार्गाचे बांधकाम सुरू असून, या रेल्वे मार्गावर वांजळे गावाच्या समोर किरवली येथे बोगदा खोदला जात आहे. 300 मीटर लांबीचा असलेल्या हा बोगदा एकाच वेळी किरवली आणि वांजळे बाजूने खोदला जात आहे.

त्या बांधकामात मोठ्या प्रमाणात चिखलमय माती बाहेर काढली जात असून, वांजळे भागातील ओलसर माती ट्रक भरून अन्यत्र नेली जात आहे. गेली महिनाभर ओली मातीचा भराव बोगद्यातून बाहेर काढून वांजळे गावाच्या समोरून कर्जत-कल्याण रस्त्याने पुढे नेण्यात येतात. त्या ट्रकमधून नेली जाणारी माती ओली असल्याने ट्रक जाणाऱ्या मार्गावर सर्वत्र चिखल साचला आहे. मोठ्या ट्रकमधून देऊळवाडी गावातून मुंबई-पुणे रेल्वे मार्गाच्या कामासाठी ती माती नेण्यात येत आहे. मात्र, त्या माती वाहून नेणाऱ्या ट्रकमुळे कल्याण-कर्जत रस्ता निसरडा झाला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या बिनधास्त कारभाराबद्दल स्थानिक रहिवासी आणि आरपीआय विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲड. उत्तम गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ओलसर मातीने रस्ता व्यापला असून, सुरू असलेल्या पावसामुळे ती माती अधिक निसरडी झाली आहे. दुचाकीस्वार यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तर, दुसरीकडे सध्या गणेशोत्सवासाठी लोकांची वर्दळ वाढली असल्याने रस्ते तुडुंब भरून गेले आहेत.त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाल माती बाजूला करण्याची सूचना कर्जत तहसीलदार यांच्याकडून देण्यात यावी, अशी मागणी ॲड. गायकवाड यांनी केली आहे.

Exit mobile version