महामार्गावर चिखलच चिखल

। सुकेळी । वार्ताहर ।
दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रोहा, सुधागड, पेण, माणगाव, अलिबाग सर्वच तालुक्यांना पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यामुळे वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू असून काही ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. मुंबई-गोवा महामार्ग म्हटला की, दरवर्षी पावसाळा सुरू झाला की वाहनचालकांना तसेच प्रवाशी वर्गाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महामार्गावर जे मोठ-मोठे खड्डे पडलेले होते. त्या खड्ड्यांमधे संबंधित ठेकेदारांकडून दगड व माती वापरुन हे खड्डे भरुन वाहनचालकांच्या जीवाशी खेळ खेळला आहे. सध्या दोन ते तीन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हे दगड-गोटे रस्त्यावर आजुबाजुला पसरलेले आहेत. त्याचप्रमाणे चिखलाचे देखील मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले आहे. यामधून वाट काढताना वाहनचालकांची अक्षरशः दमछाक होत आहे. त्यामुळे या महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी व महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी वाहनचालकातून व प्रवाशांतून होत आहे.

Exit mobile version