मुंबई – नवी मुंबई विमानतळे जोडण्यासाठी कोट्यवधींची मेट्रो

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रोने जोडण्यासाठी तब्बल 24,000 कोटी रुपयांचा प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे. 3 ते 4 महिन्यांत या प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

सध्या नवी मुंबईत बेलापूर ते पेंधर ही लाईन 1 कार्यरत आहे, जी गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे आणि आतापर्यंत 1 कोटी 10 लाखांहून अधिक लोकांनी त्याचा प्रवास केला आहे. आता या नव्या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 32 किमी असून, त्यापैकी 9 किमी मार्ग हा अंडरग्राऊंड (भूमिगत) असेल. ही मेट्रो नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या सर्व विभागांना मेट्रोच्या जाळ्याने जोडणारी ठरेल. मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि विस्तार हा विमानतळाच्या पूर्वेला पनवेल शहर, उरण आणि तिसरी मुंबई यांना जोडणारी मेट्रो लाईन उभारली जाईल.

नवीन 32 किमी लाईनसाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून, हे काम पीपीपी तत्त्वावर केले जाणार आहे. सध्या पीअर रिव्ह्यूचे काम सुरू असून, निधीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवून निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल. एम-24 आणि एम-26 यांसारख्या इतर मार्गांचेही नियोजन आणि डीपीआर तयार असून ते मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवले जाणार आहेत. एमएमआर क्षेत्रातील प्रवाशांना नवी मुंबई विमानतळ किंवा इतर भागात जाण्यासाठी कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी हे मेट्रोचे जाळे लवकरात लवकर उभारण्याचे उद्दिष्ट असल्याचेही विजय सिंघल म्हणाले.

Exit mobile version