तळा नगरपंचायत प्रशासन निष्क्रिय
ॲड. निलेश रातवडकर यांचा आरोप
| तळा | प्रतिनिधी |
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत तळा नगरपंचायतीसाठी मंजूर करण्यात आलेली तब्बल 13 कोटी 70 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नियोजित कालावधी उलटूनही कामाला गती न आल्याने तळा नगरपंचायत प्रशासन निष्क्रिय असून, ठेकेदाराला जावयाप्रमाणे वागणूक दिली जात आहे, असा आरोप भाजपचे तळा तालुकाध्यक्ष ॲड. निलेश रातवडकर यांनी केला आहे.
या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन दि.17 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले होते. त्यानंतर मार्च 2024 मध्ये संबंधित ठेकेदार कंपनीला काम सुरू करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. या प्रकल्पाचा काम पूर्ण करण्याचा कालावधी 18 महिन्यांचा निश्चित करण्यात आला होता. मात्र, आता तब्बल 24 महिने उलटूनही काम अपूर्ण अवस्थेत असून, प्रकल्पाला अपेक्षित गती मिळालेली नाही, अशी टीका रातवडकर यांनी केली आहे. तळा शहरातील वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन ही योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेंतर्गत नवीन जलस्रोत विकसित करणे, शहरभर नवीन पाईपलाईन टाकणे तसेच पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणे, अशा विविध कामांचा समावेश होता. या माध्यमातून तळा शहरातील नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचा शासनाचा उद्देश होता. मात्र, प्रत्यक्षात या कामांची अंमलबजावणी अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना अजूनही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, तळा शहरातील कुंभार आळी येथील बापूजी देवस्थान यात्रा उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक आणि ग्रामस्थ येथे दाखल होत असतात. या कालावधीत नगरपंचायतीकडून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात अपयश येत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, कामात ढिलाई, योग्य नियोजनाचा अभाव आणि ठेकेदारांवर प्रभावी नियंत्रण नसणे या कारणांमुळे ही योजना कोलमडली आहे. एवढा मोठा निधी मंजूर होऊनही काम अपेक्षित वेगाने पूर्ण होत नसल्याने निधीचा योग्य वापर झाला आहे का, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.






