। पाली/बेणसे । वार्ताहर ।
बहुउद्देश्यीय संकुलाने आदिवासींच्या सुमारे 37 हजारांहून अधिक कुटुंबांचा विकास होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला. रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यातील माणगाव खुर्द येथील सुमारे 17 हेक्टर गुरचरण जमीन आदिम जमातीच्या बहुउद्देशीय संकुल उभारणीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांना प्रदान करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील आदिवासींच्या सुमारे 37 हजारांहून अधिक कुटुंबांचा विकास यामुळे होणार आहे. तसेच जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या आदिवासींच्या विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी या बहुउद्देशीय संकुल उभारणीची प्रक्रिया राज्यात सर्वप्रथम रायगड जिल्ह्यात होत असल्याने जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण व गौरवास्पद बाब असल्याने अभिमानाची भावना जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली.
या संकुलामध्ये इ. 1 ली ते 12 वीकरिता 1 हजार विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा, 500 मुलांच्या राहण्याची क्षमता असलेले वसतिगृह, 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय, 200 खाटांचे बहुउद्देशीय रुग्णालय, 500 लोकांच्या क्षमतेचे सभागृह, तंत्रशिक्षण-कौशल्य विकास, 1 हजार मे. टन क्षमतेचे साठवणूक गोदाम, 200 कर्मचारी निवासस्थाने, शेती व शेळीपालनासाठी कृषी कौशल्य विकास केंद्र, वनधन प्रक्रिया केंद्र, बागबगीचा-खेळ मैदाने, संरक्षक भिंत, पाणीपुरवठा, विद्युतीकरण, सोलार संयंत्रे, मलनिस्सारण केंद्र, वाहनतळ, संकुलासाठी अंतर्गत रस्ते व इतर सुविधांसह आदिवासी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन केंद्र अशा विविध सुविधांचा समावेश असणार आहे.







