। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
एकीकडे एसटी कर्मचार्यांचा संप सुरु असताना मुंबईला जाण्याचा जलमार्ग पर्याय देखील तीन दिवसांसाठी बंद झाल्याने अलिबागमधील प्रवाशांची दुहेरी कोंडी झाली आहे. त्यामुळे खाजगी वाहने आणि शेअर टॅक्सीचा वापर करून मुंबई आणि पनवेल गाठण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.
अलिबागमधील एसटीच्या कामगार संघटनांनी आपली आडमूठी भुमिका अद्याप सोडलेली नाही. पगारवाढ मिळूनही अलिबाग आगारातील कर्मचार्यांनी संप सुरुच ठेवला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दुसरीकडे नौदल सप्ताहामुळे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते मांडवादरम्यान सुरु असणारी जलप्रवासी वाहतूक 2 ते 4 डिसेंबर अशी तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत जाणार्या आणि अलिबागला येणार्या पर्यटकांची दुहेरी कोंडी झाली आहे. या मार्गे दररोज सुमारे साडेतीन हजार प्रवासी प्रवास करतात. शनिवार रविवार या दोन दिवसात या जलमार्गावरील प्रवाशांची संख्या आठ ते दहा हजारांपर्यंत पोहोचते.