सूर्यकुमार-नेहालचं झंझावाती अर्धशतक
गुणतालिकेत मुंबईची तिसर्या स्थानी झेप
| मुंबई | प्रतिनिधी |
वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना पार पडला. सुर्यकुमार यादवच्या वादळी फलदांजीसमोर आरसीबीच्या गोलंदाजांचा निभाव लागला नाही. आरसीबीने दिलेले 200 धावांचे आव्हान मुंबईने 17 व्या षटकात पूर्ण केलं. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाला असला तरी ईशान किशन, सुर्यकुमार यादव आणि नेहाल वढेरा यांनी विजय खेचून आणला.
सुर्यकुमार यादव आरसीबीच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने अवघ्या 37 बॉलमध्ये 83 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने सात चौकार आणि सहा षटकार लगावले. मुंबई इंडियन्सने या विजयानंतर गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. गुजरात टायटन्स प्रथम, चेन्नई सुपर किंग्ज दुसर्या तर मुंबई तिसर्या स्थानी पोहोचली आहे.
आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना 199 धावा केल्या होत्या. तर मुंबई 200 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरली होती. सुरुवातीला ईशान किशनने 21 चेंडूंमध्ये 42 धावा करत मुंबईच्या विजयाचा पाया रचला. रोहित शर्मा केवळ 7 धावा करून बाद झाला. यानंतर मैदानात उतरलेल्या सुर्यकुमार यादव आणि नेहाल वढेरा यांनी मुंबईच्या विजयाचा कळस चढवला. तिसर्या गड्या साठी दोघांनी 62 चेंडूंत 140 धावांची भागिदारी केली. तर, नेहाल वढेरा 34 चेंडूंमध्ये 52 धावा करुन नाबाद राहिला. आरसीबीनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 199 धावा केल्या. सुरुवातीला 16 धावांवर दोन गडी बाद झाले होते. त्यानंतर फाफ डु प्लेसिस आणि मॅक्सवेलनं 120 धावांची भागिदारी केली. यानंतर मॅक्सवेलनं 33 चेंडूंत 68 धावा केल्या. तर, फाफ डु प्लेसिसनं 41 चेंडूंमध्ये 65 धावा केल्या. तर, दिनेश कार्तिकनं 30 धावा करत आरसीबीला 199 धावांपर्यंत पोहोचवलं.